पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
४९०
 


रामचंद्रपंत
 त्यानंतर छत्रपती राजाराम गादीवर आले. त्यांच्या ठायी फारसे कर्तृत्व नव्हते, पण आपल्या उदार व त्यागी वृत्तीमुळे कर्ती माणसे एकठाय आणून त्यांची जूट काही काळ टिकविण्यात त्यांना बरेच यश आले. पण वरील काळात, लोकांत खरे चैतन्य निर्माण झाले ते शंभुछत्रपतींच्या अलौकिक आत्मबलिदानामुळे, हे मागे सांगितलेच आहे. यावेळी ज्या पाचसहा पुरुषांनी देशाची धुरा सांभाळली त्यांच्यांत रामचंद्रपंत अमात्यांचे स्थान मोठे आहे. या काळाचा खरा शास्ता हाच होता. स्वराज्यरक्षणाच्या सर्व योजनांची आखणी करावयाची आणि सर्व गुणी माणसे एका बंधनात ठेवून त्यांना कार्यान्वित करावयाचे हे शासकाचे फार मोठे कार्य रामचंद्रपंताने या वेळी केले. शिवछत्रपतींचे तत्त्ज्ञान व धोरण काय होते हे त्याने पुरे आत्मसात केले होते. त्यावर तर 'आज्ञापत्र' हा छोटासा ग्रंथच याने लिहिला होता. ते सर्व तत्त्वज्ञान त्याला त्या परिस्थितीत प्रत्यक्षात आणता आले नाही. पण ते पुढे ठेवूनच त्याने राज्यकारभार चालविला. यामुळेच मोगलांना कडवा प्रतिकार करण्यात मराठ्यांना यश आले. राजाराम महाराजांनी त्यांचा हाच गौरव केला आहे. 'त्यांनीही- रामचंद्रपंतांनी- निष्ठापूर्वक वर्तोन स्वामींचे राज्य तांब्राक्रांत झाले होते ते संपूर्ण यथापूर्व हस्तगत केले,' असे त्यांनी म्हटले आहे.
 शासकीय कारभारात याच प्रकारचे कार्य शंकराजी नारायण व परशुराम त्रिंबक यांनी केले. मावळ भाग आणि औंध पन्हाळा भाग ही यांची कार्यक्षेत्रे होत. हे दोघेही रामचंद्रपंत अमात्य याच्याच हाताखाली प्रारंभी होते आणि आताही त्याच्याच हाताखाली काम करीत होते. परशुराम त्रिंबकाविषयी लिहिताना, 'परशुरामपंताने लोकांचे ठिकाणी स्वराज्याभिमान जागृत करून मिरजेपासून रांगण्यापर्यंतचा प्रदेश मोगलांपासून सोडविला,' असे नानासाहेब सरदेसाई यांनी म्हटले आहे. याविषयी अधिक तपशील मिळता तर बरे होते. असो. हे दोघे प्रशासनाप्रमाणेच रणांगणावरही मर्दुमकी गाजवीत. यामुळे त्या काळी त्यांचा उपयोग विशेष झाला.

संताजी
 रणांगणावरचा अग्रेसर नेता म्हणजे संताजी घोरपडे हा होय. त्याच्या पराक्रमाचे वर्णन मागे केलेच आहे. त्याच्या योग्यतेविषयी लिहिताना नानासाहेब म्हणतात, 'विस्तीर्ण भूप्रदेशावर प्रचंड फौजा नाचवून शत्रूस हटकून गोत्यात आणणारा संताजी- एवढा कुशल सेनानी बहुधा क्वचित आढळतो. त्याचे हुकूम असंदिग्ध व सुटसुटीत असत. अवज्ञा करणारास तो निष्ठुर शासन करी. तो शिवाजीच्या शिस्तीत मुरलेला असून, तिचेच अनुकरण करण्याचा तो प्रयत्न करी. परंतु त्याचे चीज करणारा शिवाजीसारखा धनी त्यास मिळाला नाही ही दुःखाची गोष्ट आहे.'