पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
४९२
 

कैफियती पाहता, त्यांना फक्त आपल्या वतनाची काळजी होती, असे वाटल्यावाचून राहात नाही.

फितुरी
 मसूरच्या जगदाळ्याचे उदाहरण प्रसिद्ध आहे. १६८७ साली महादजी जगदाळे याने संभाजी महाराजांच्याकडून मसूरची देशमुखी कायम करून घेतली. १६८९ साली त्या भागात मोगल येताच त्याने मोगलांची ताबेदारी पतकरली. १६९० साली संताजी घोरपडे याने महादजीला पकडले. पण तेथून सुटल्यावर त्याने जिंजीला जाऊन राजाराम महाराजांकडून देशमुखीची सनद परत मिळविली. आणि १६९९ साली अशाच कारणाने तो परत मोगलांना मिळाला. जेध्यांची गोष्ट अशीच आहे. १६८३ मध्ये बाजी सर्जेराव जेधे वतनरक्षणासाठी मोगलांना मिळाला. त्यावर संभाजी महाराजांनी रागावून त्याला पत्र लिहिले. तेव्हा तो परत नीळकंठ मोरेश्वर पेशवे यांपाशी रुजू झाला. पण महाराजांच्या मृत्यूनंतर खोपडे व वतनदारामागोमाग जेधेही मोगलांना मिळाला. नंतर १६९० साली पुन्हा मराठ्यांना आणि १७०२ साली पुन्हा मोगलांना मिळाला. म्हसवडचा नागोजी माने हा १६८३ पूर्वीच मोगलांना मिळाला. नंतर काही काळ मराठ्यांच्याकडे येऊन पुन्हा तो मोगलांकडे गेला.
 वतनासक्तीमुळे झालेल्या फितुरीची ही ठळक उदाहरणे झाली. कान्होजी व गणोजी शिरके, यशवंतराव दळवी, रायभानजी भोसले, सखाजी डफळे, शंकराजी मल्हार ही अशीच आणखी उदाहरणे आहेत. १६८६ नंतर साल्हेर, रामसेज हे किल्ले मोगलांनी घेतले ते बहुतेक फितुरीने घेतले हे मागे सांगितलेच आहे या सर्वावर कळस चढविला तो सूर्याजी पिसाळाने. त्याने महाराणी येसूबाई, बालराजे शाहू यांसकट रायगड ही राजधानीच मोगलांच्या स्वाधीन केली आणि नंतर तो स्वधर्मत्याग करून मुसलमानही झाला.

विडी पेटते
 पण फितुरीची ही साथ अशा ठळक उदाहरणांपुरतीच मर्यादित नव्हती. ती खोलवर भिनत गेली होती. औरंगजेबाचा मुक्काम तुळापुरास असताना त्याच्या महसूल अधिकाऱ्यांनी देशमुख, देशपांडे, पाटील, कुलकर्णी इ. वतनदार मंडळींचा, दवंडी पिटून, जमावच छावणीत जमविला. खेड्यांचे, परगण्यांचे, प्रांतांचे वसुलीचे कागद, हक्कासंबंधीचे कागद, जमाबंदीचे कागद हे सर्व घेऊन ही वतनदार मंडळी बादशहाकडे आली आणि आपापले हक्क, वतने यांच्या सदना त्यांनी बादशहाकडून घेतल्या. याचा अर्थ असा की या वतनदारांनी मराठी राजाची सत्ता टाकून औरंगजेबाची सत्ता मान्य केली. आणि याच वेळी, याच छावणीत महाराणी येसूबाई व शाहू यांना कैद करून आणण्यात आले होते. त्या महाराणीची व बालराजांची- त्यांच्यावरील आपत्तीची- कसलीही लाज यांना नव्हती. म्हणूनच सेतुमाधवराव पगडी यांनी या