पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४८९
प्रेरणांची मीमांसा
 

आकांक्षा कोणत्या असाव्या, अनेकविध विद्यांचे महत्त्व काय, या सर्वांचा विचार, या दृष्टीने समाजाला प्रेरणा देणारे नेतृत्व ते व्यापक नेतृत्व होय. शिवछत्रपतींचे नेतृत्व तसे होते; हे त्यांच्या कर्तृत्वाचे विवेचन मागे केले त्यावरून दिसून येईल. त्या दृष्टीने पाहिले तर असा नेता या पंचवीस वर्षात आणि पुढेही महाराष्ट्राला मिळाला नाही हे। स्पष्ट दिसते. या काळात छत्रपती संभाजी, छत्रपती राजाराम, महाराणी ताराबाई या राजघराण्यातील व्यक्ती आणि रामचंद्रपंत अमात्य, शंकराजी नारायण, संताजी, धनाजी, परशुराम त्रिंबक, खंडोजी बल्लाळ, असे मंत्री, सरदार हे मराठ्यांचे नेते होते. यांच्यात शिवछत्रपतींच्या तोडीचा तर कोणी नव्हताच, पण तसे त्या जातीचे सर्वांगीण नेतृत्व करणाराही कोणी नव्हता, हे ध्यानात घेतले पाहिजे. शिवछत्रपतींच्या- सारखा युगपुरुष वरचेवर होत नसतो. पण त्या जातीचे थोडे कमी दर्जाचे नेतृत्वही मराठ्यांना लाभले नाही. त्यांनी असामान्य शौर्य गाजवून स्वातंत्र्ययुद्ध जिंकले, याबद्दल त्यांचा गौरव केला पाहिजे, यात शंका नाही. पण राष्ट्रीय नेतृत्वाच्या दृष्टीने ते कोठे उणे पडले याचीही चिकित्सा केली पाहिजे.

नवे कर्तृत्व
 यांतील शंभुछत्रपतींच्या नेतृत्वाविषयी वर विचार केलाच आहे. त्यांनी चौफेर नजर राखून सर्व आघाड्यांवर औरंगजेबाशी लढा दिला, ही त्यांची कर्तबगारी फार मोठी होय. शिवाय, एकदा ते मोगलांना मिळाले होते, तसा मोह त्यांना पुन्हा झाला नाही, हे महाराष्ट्राचे महद्भाग्य म्हटले पाहिजे. तसे झाले असते तर सगळाच ग्रंथ आटोपला होता. पण तसा विचार त्यांच्या स्वप्नातही आला नाही. राज्यारोहण केल्यापासून मृत्यू येईपर्यंत, अत्यंत निर्धाराने, त्यांनी मोगलांविरुद्ध लढा केला आणि स्वराज्याचे रक्षण केले. पण याच्याही वर जाऊन राष्ट्रधर्माची प्रेरणा देऊन नवे कर्ते पुरुष त्यांना निर्माण करता आले नाहीत. जुन्यापैकी अनेक कर्ते पुरुष त्यांनी मारून टाकले आणि हंबीरराव मोहित्यांसारखे जे त्यांच्याशी एकनिष्ठ होते ते कालवश होताच मराठ्यांचा लढा ढिला पडला. आणि १६८६ सालापासून एकेक गड ढासळू लागला. मोगलांनी पुढल्या दोन-तीन वर्षात बहुतेक गड फितुरीने घेतले. राष्ट्रधर्माची प्रेरणा देण्याचे सामर्थ्य छत्रपतींच्या ठायी असते तर असे घडले नसते. पण याहीपेक्षा एक गोष्ट मनाला खटकते ती ही की त्यांच्या वधानंतर रामचंद्रपंत अमात्यादी जे पाचसहा थोर नेते उदयास आले ते, शिवकालापासून स्वराज्यकार्य करीत असूनही, शंभुछत्रपतींच्या वेळी पराक्रम करू शकले नाहीत. शंभुछत्रपती हे उग्रप्रकृती होते, असे इतिहास सागतो. त्यांच्या या प्रकृतीमुळे शिवकालात उदयास येत असलेले कर्ते पुरुष दबकून राहिले, असे दिसते. आणि त्या स्वभावामुळेच नवे कर्तृत्व त्यांना निर्माण करता आले नाही.