पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



२५.
स्वातंत्र्ययुद्ध : प्रेरणांची सीमांसा
 



विषम संग्राम
 औरंगजेबासारख्या महाबलाढ्य शत्रूशी उणीपुरी पंचवीस सव्वीस वर्षे मराठ्यांनी जो संग्राम केला त्याचे वर्णन मागल्या प्रकरणात केले. केवळ मराठ्यांच्याच नव्हे, तर अखिल भारताच्या इतिहासातसुद्धा हा संग्राम अद्वितीय ठरतो, असे इतिहातपंडित सांगतात. त्यांचे ते मत अगदी यथार्थ आहे, असे वाटते. सेतुमाधवराव पगडी यांनी म्हटल्याप्रमाणे, मोगलांचे आक्रमण हे एका बादशहाचे आक्रमण होते, तर मराठ्यांचा लढा हा जनतेचा लढा होता. मोगलांचे सर्व सेनापती, सरदार, हे मोठ्या खानदानी घराण्यातले होते, तर मराठ्यांचे सेनापती, सरदार हे मराठा, ब्राह्मण, प्रभू येथपासून रामोशी, बेरड, कोळी येथपर्यंत सर्व जाती-जमातीतून आलेले होते. म्हणजे हा संग्राम मुळापासूनच विषम संग्राम होता. म्हणूनच मोगलांना त्यात संपूर्ण अपयश आले आणि त्यांच्या साम्राज्यसत्तेला पायापासून हादरा बसला.
 अशा या स्वातंत्र्य-संग्रामाचा अवश्य तो सर्व तपशील मागल्या प्रकरणात दिला आहे. आता येथे त्याची सर्व दृष्टींनी मीमांसा करावयाची आहे.

नेतृत्व
 प्रथम या पंचवीस वर्षातल्या काळातल्या मराठ्यांच्या नेतृत्वाचा विचार करू. येथे नेतृत्व या शब्दाचा अर्थ केवळ युद्धनेतृत्व असा नाही, तर सर्व राष्ट्रीय नेतृत्व अशा व्यापक अर्थाने येथे विचार करावयाचा आहे. देशाच्या उत्कर्षाला अवश्य अशी अर्थव्यवस्था काय असावी, याच दृष्टीने धर्माचे स्वरूप काय असावे, समाज- रचनेच्या दृष्टीने आपल्या राष्ट्रात कोणत्या उणिवा आहेत, जनतेच्या राजकीय