पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
४८६
 


उत्तरेवर आक्रमण
 या काळात मराठे महाराष्ट्रातच फक्त मोगलाशी लढा करीत होते असे नाही. नेमाजी शिंदे, केसोपंत पिंगळे आणि परसोजी भोसले हे ५० हजार स्वार घेऊन नर्मदा उतरोन काळबाग पावेतो लुटीत गेले. १७०५ साली धनाजी जाधव, नेमाजी शिंदे, दादो मल्हार, रंभाजी निंबाळकर चाळीस हजार स्वारांनिशी घोडदौड करीत सुरतेवर गेले आणि तेथून भडोचपर्यंतचा सर्व मुलूख त्यांनी फस्त केला. त्यांजवर नजर अलीखान व ख्वाजा हमीद हे चालून गेले; पण त्यांचा मराठ्यांनी फन्ना उडविला, त्या दोघांना कैद केले व त्यांच्यापासून आठ लाख रुपये दंड घेऊन त्यांना सोडून दिले. त्याच साली मराठे माळव्यातही उतरले. बऱ्हाणपूर, वऱ्हाड, खानदेश येथे त्यांच्या स्वाऱ्या नित्याच्याच होत्या. पण आता मराठ्यांनी या परगण्यात कायमचा अंमल बसविण्यास सुरुवात केली. जिंकलेल्या प्रदेशात सुभेदार, कमाविसदार असे अधिकारी नेमू लागले आणि चौथाई, दस्तुरी वसूल करू लागले. याच वेळी बुंदेलखंडात छत्रसालाने उठावणी केली होती. १७७३ साली नेमाजी शिंदे प्रथम माळव्यात व नंतर बुंदेलखंडातही शिरला होता. पण बुंदेलखंडात छत्रसाल सर्व बुंदेलांना उठवू शकला नाही. नाहीतर तेथेही माेंगली सत्ता राहिली नसती.
 उत्तरेवर या चढाया चालू असताना मराठे तिकडून बादशहाकडे येणारे लमाणांचे तांडे लुटून फस्त करीत आणि खजिना घेऊन येणाऱ्या शिबंदीचाही नायनाट करीत. त्यामुळे बादशहा पूर्ण नागविला गेला. अन्नधान्य नाही, युद्धसामग्री नाही, पैसा नाही, अशी त्याची स्थिती झाली.

बादशहाचा मृत्यू
 अशा स्थितीत बादशहा अहमदनगरास आला व त्याची प्रकृती जास्तच खालावली. घोर निराशेने त्यास ग्रासले होते. आपण कशाला या मराठ्यांच्या युद्धाच्या फंदात पडलो असे त्यास झाले. त्याचे पुत्र व सरदार त्याच्या मरणाची वाट पहात होते. तो मरतो केव्हा व आपण राज्य घेतो केव्हा, याचीच सर्वांना विवंचना लागली होती. आजमशहा व कामबक्ष हे दोन शहाजादे त्याच्याजवळ होते. पण एक दुसऱ्याला मारील अशी बादशहाला भीती वाटत होती. अशा रीतीने वैफल्य, निराशा, भीती यांनी तो अगदी खचून गेला आणि २० फेब्रुवारी १७०७ रोजी त्याच स्थितीत त्याचा अंत झाला.
 बादशहाचा अंत्यविधी उरकल्यावर अहंमदनगर येथे पुत्र आजमशहा तखतनशीन झाला. पण अफगाणिस्तानातून मोठा मुलगा शहा आलम दिल्लीवर चालून येत आहे अशी वार्ता आली. तेव्हा आजमशहाही उत्तरेकडे निघाला. तेवढ्यात बातमी आली की ताराबाईने बहुतेक सर्व किल्ले घेतले आणि धनाजीने पुणे व चाकण ही मारली. तेव्हा सर्व सरदारांचा विचार घेऊन आजमशहाने शाहूराजांना, मराठ्यांच्यात दुही