पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४८५
स्वातंत्र्ययुद्ध
 

लढा पूर्वीच्याच आदेशाने, पुढे चालविला. १७०० ते १७०७ या सात वर्षातील राज्यरक्षणाचे श्रेय इतिहासकार ताराबाईला देतात. काफीखानासारख्या मुस्लिम लोकांनीसुद्धा तिचा गौरव केला आहे आणि तिने केलेल्या कार्यावरून तो खरा आहे असे दिसते.

लांडगेतोड
 या सात वर्षातल्या युद्धाची कथा मागल्या काळापेक्षाही जास्त रसरशीत आहे. औरंगजेबाचा आपल्या सरदरांवर विश्वास राहिला नव्हता. त्यामुळे तो स्वतः मोहीमशीर झाला आणि मराठ्यांचे किल्ले घेण्याचा त्याने सपाटा लावला. इ. स. १७०० च्या एप्रिलपासून इ. स. १७०५ एप्रिलपर्यंत त्याने सातारा, परळी, पन्हाळा, सिंहगड, खेळणा इत्यादी मराठ्यांचे दहा किल्ले घेतले. पण हे किल्ले त्याने कसे घेतले, त्यांचे पुढे काय झाले आणि या अवधीत मराठ्यांनी मोगल फौजेची कशी लांडगेतोड केली, हे पाहिले म्हणजे मोगल साम्राज्य व त्याचा सत्ताधीश औरंगजेब यांची मृत्युपंथाकडे ही वाटचाल सुरू झाली होती, हे स्पष्ट दिसू लागते.
 या दहा किल्ल्यांपैकी मोगलांनी लुटून जिंकून घेतला असा फक्त तोरणा किल्ला होय. बाकीच्या सर्व किल्लेदारांना पैसे देऊन ताब्यात घेतलेले होते. पण या वेळी मराठयांनी पैसे घेऊन किल्ले दिले. याला फितुरी असेही पण म्हणता येत नाही. कारण किल्ले घेतल्यानंतर, त्यांची व्यवस्था ठेवण्याची कुवत बादशहाला नाही, हे मराठयांनी चांगले ओळखले होते. त्यामुळे, पाचसहा महिने किल्ला लढविल्यानंतर, दमछाक झाल्यावर, ते किल्ला ताब्यात देत आणि वेढा उठवून बादशहा निघून गेला की लगेच किल्ला जिंकून घेत. या रीतीने हे सर्व किल्ले मराठ्यांनी थोड्याच अवधीत परत घेतलेले आहेत. यामुळे मोगलांचे अपरिमित नुकसान होत होते आणि बादशहाची छीथू होत होती.
 पण याहीपेक्षा मोगलांची भयंकर हानी होत होती ती किल्ल्याच्या परिसरातील दहावीस मैलांच्या टापूत मराठे लांडगेतोड करीत त्यामुळे. धनाजी जाधव, हणमंतराव निंबाळकर, राणोजी घोरपडे, असे सरदार मोगली फौजेवर सारखे फिरते हल्ले चढवीत. त्यांचा दाणागोटा, शस्त्रास्त्रे, दारूगोळा लुटीत, सर्व प्रकारे विध्वंस करून शेकडो सैनिकांना ठार मारीत आणि सरदारांना लाख, दोन लाख दंड करून सोडून देत. ओला-सुका दुष्काळ, वारेवादळ, पूर यांमुळे आणि रोगांच्या साथीमुळे लष्कराचे हाल होत ते निराळेच. इटालियन प्रवासी मनूचीने लिहून ठेविले आहे की औरंगजेबाच्या लष्करात दरसाल एक लाख माणसे व हत्ती, घोडे, उंट, बैल अशी तीन लाख जनावरे मृत्युमुखी पडत. मोठमोठे सरदार भिकारी झाले. त्यांच्या बायका दारोदार भीक मागत हिंडू लागल्या !