पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
४८४
 

लढाया होत राहिल्या. या सर्वांची चिकित्सा पुढे करावयाची आहे. प्रथम १७०७ पर्यंत मोगलांचा प्रतिकार मराठ्यांनी कसा केला हे पाहू.

राजाराम - पुण्याई
 १६९७ च्या अखेरीस राजाराम महाराज जिंजीच्या वेढ्यातून सुटून विशाळगडावर परत आले. या वेळी झुल्पिकारखानाने स्वतःच राजारामांच्या सुटकेची व्यवस्था केली होती. त्यांनी कोठून कसे सुटून जावे, हे त्यानेच महाराजांना कळविले होते. शिवाय मोगलांच्या बाजूने वेढ्याचे काम करणारे सरदार शिर्के याना खंडोजी बल्लाळ यांनी आपल्याकडे आलेले त्यांचे वतन त्यांना परत देऊन, वश करून घेतले. त्यामुळे सुटका सुलभ झाली. पण राजाराम महाराज पुढे फार दिवस जगले नाहीत. विशाळगडावरून नर्मदापार मोठी मोहीम काढावयाची, असे ठरवून ते बाहेर पडले, पण मोहिमेला प्रारंभिक यशही आले नाही. आणि नेटाने, तडफेने काही करण्याची कुवत राजारामांच्या ठायी नव्हती. त्यातच त्यांची प्रकृती बिघडली आणि इ. स. १७०० च्या मार्चमध्ये सिंहगडावर त्यांचा अंत झाला. आणि स्वराज्याला दुसरा धक्का बसला. राजारामांच्या ठायी कर्तृत्व नव्हते; पण त्या काळी राजा ही पुण्याई होती. स्वामी कसाही असला तरी स्वामिनिष्ठेने लोक बांधले जात व आपल्याला धनी आहे ही भावना प्रजेच्या मनात असे. तो दिलासा आता गेला, आणि लोक उघडे पडले.

ताराबाई
 पण याहीपेक्षा मोठी हानी झाली ती म्हणजे मराठी राज्य आता दुभंगले. राज्याचा खरा मालक शाहू कैदेत होता. तो सुटेल तेव्हा तोच गादीवर यावयाचा, असा संकेत सर्वांच्या मनात होता. पण राजारामाची राणी ताराबाई हिचा आग्रह असा की आपला मुलगा शिवाजी हाच खरा राज्याचा धनी. तेव्हा त्याला अभिषेक झाला पाहिजे. रामचंद्रपंत अमात्य याचा याला विरोध होता. युद्ध संपेपर्यंत हा वाद काढू नये, दुही बाहेर दिसू नये, असे त्याला वाटे. पण शंकराजी नारायण, परशुराम त्रिंबक यांना ताराबाईने वळवून घेतले होते. तेव्हा पंतानी माघार घेतली व अभिषेकास संमती दिली. पण या वेळेपासून त्यांचे मन विटून गेले आणि त्यांचा आवेश संपुष्टात आला.

पुन्हा निराशा
 संभाजी महाराज गेले, तेव्हा आता मराठ्यांचे राज्य आपण सहज बुडवू, असे बादशहाला वाटू लागले. राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर त्याला पुन्हा तशीच आशा वाटू लागली. पण याही वेळेस त्याला निराशेचा जबर तडाखा बसला. मराठ्यांचा जोम, आवेश, प्रतिकारशक्ती, पराक्रम कमी न होता वाढतच आहे, असे त्यास दिसू लागले. राजाराम गेल्यावर ताराबाईने कारभार हाती घेतला आणि स्वातंत्र्याचा