पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४८३
स्वातंत्र्ययुद्ध
 

कर्नाटकात जिंजीपर्यंत युद्धक्षेत्र पसरले होते. १६९० च्या ऑगस्टमध्ये झुल्लिकार खानाने जिंजीस वेढा घातला आणि १६९८ च्या फेब्रूवारीत किल्ला पडला. पण ही आठ वर्षे सतत वेढा चालू होता असे नाही. जिंजीला महाराष्ट्रातून जाणारी धान्य- सामग्री, दारूगोळा आणि लष्कर यांना मराठी फौजा इतके हैराण करीत की खानाला दोनतीनदा वेढा उठवून दूर निघून जावे लागले होते. जिंजीच्या वेढ्यावरही संताजी धनाजी सारखे तुटून पडत आणि अनन्वित संहार व विध्वंस करीत. शिवाय मोगलांची अशी नामुष्की झालेली दिसताच कर्नाटकातील समस्त हिंदुसत्ताधीश मराठ्यांच्या पक्षाचे झाले. याचप्पा नाईक हा तिकडचा शूर सरदारही मराठ्यांना मिळाला आणि हे सर्व लोक अन्नधान्याची वाहतूक व लष्कराच्या हालचाली या बाबतीत मोगलांची कोंडी करू लागले. यामुळे झुल्पिकारखान एकदा इतका हताश झाला की राजाराम महाराजांच्याकडे माणूस पाठवून त्याने असे सुचविले की 'तुम्ही मागाल तो दंड देतो. पण जिंजीवरून आम्हास सुरक्षित बाहेर जाऊ द्या.' प्रत्यक्षात त्याने तसे कधी केले नसते, बादशहाने त्यास तसे करू दिले नसते, हे खरे. पण वेळ आली होती. यावरून मराठ्यांनी मोगली सेनेची किती दुर्दशा केली होती ते दिसून येते.

दुडेरीचा संग्राम
 १६९५ च्या अखेरीस संताजी व धनाजी तुंगभद्रा उतरून जिंजीकडे निघाले असता बादशहाने कासिमखानास त्यांच्यावर पाठविले. आणि मागोमाग खानाजादखान या बड्या सरदारास त्याच्या मदतीस पाठविले. या बड्या सरदाराचा मोठा पाहुणचार करावा असे कासिमखानास वाटले. आणि अडोणी, चित्रदुर्ग या परिसरात मोठा भपकेबाज शामियाना त्याने उभारला. संताजीला याची खडानखडा बातमी होती. त्याने आपल्या लष्कराच्या तीन टोळ्या करून गनिमी काव्याने त्या ठाण्यावर सर्व बाजूंनी हल्ले चढविले. अन्नधान्याची नासाडी केली व सर्व गोट साफ लुटला. दोन्ही खानांना दे माय धरणी ठाय केले. शेजारीच दुडेरीची गढी होती. तिचा आश्रय त्यांनी केला. पण संताजीने गढीला वेढा घातला. तेव्हा अन्नपाण्यावाचून लष्कर तडफडू लागले. खानजादखानाने संताजीकडे तहाचे बोलणे लावले. वीस लाख दंड व सर्व सामग्री घेऊन खानाला अंगावरच्या वस्त्रानिशी सोडून दिले. कासिमखानाच्या मदतीस दुसरा एक सरदार हिंमतखान बहादूर येत होता. संताजीने बसवपट्टण येथे त्यास गाठून मैदानात त्यास ठार मारले व त्याचे सामान लुटून घेतले.
 कर्नाटकातील मराठ्यांचे हे पराक्रम पाहता वरील निष्कर्षच दृढ होतो की मोगल मराठ्यांना भारी नव्हते. पण फितुरी आणि दुही या व्याधीमुळे मराठ्यांचे बळ सारखे खच्ची होत होते. दुहीचे सर्वात भयंकर उदाहरण म्हणजे संताजी आणि धनाजी यांचे वैमनस्य आणि ते इतके की त्यांच्यात आयेवार कुटी येथे १६९६ साली प्रत्यक्ष लढाईच झाली आणि त्यातूनच पुढे दुही-फितुरीमुळे संताजीचा खून झाला. त्यानंतर ही