पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४७५
स्वातंत्र्ययुद्ध
 

जावे असेही त्याने एकदा ठरविले. पण कोणीच तयार होईना. त्याचा एक पुत्र अकबर मराठ्यांना येऊन मिळाला होता. शहा आलम आणि इतर अनेक सरदारही मराठ्यांस मिळून आहेत असे त्याला वाटू लागले. या संशयाने त्याने दिलेरखानास कडक शिक्षा केली. तेव्हा त्याने विष घेऊन आत्महत्या केली.
 चुटकीसारखे मराठ्यांचे स्वराज्य बुडवायची आकांक्षा धरून बादशहा आला होता. त्याची मराठयांनी अशी अवस्था करून टाकली. सरदेसाई म्हणतात, औरंगाबाद, चांदा, बेदर, फलटण, कल्याण, रायगड एवढ्या विस्तृत टापूत संभाजीने जो विलक्षण सामना केला त्याला इतिहासात तोड नाही. तो विलासमग्न असून त्याने राज्यरक्षणाकडे दुर्लक्ष केले या बखरकारांच्या आरोपांचा वस्तुस्थितीशी मेळ बसत नाही.

अकबर प्रकरण
 अकबर-प्रकरणातही संभाजी महाराजांच्यावर असला आरोप करता येणार नाही. अकबर हा औरंगजेबाचा मुलगा. मारवाडच्या वारसाच्या प्रकरणात औरंगजेबाविरुद्ध सर्व रजपूत उठले होते. त्या वेळी अकबर रजपुतांना मिळाला; आणि बापाविरुद्ध बंड करून उठला. त्याने बापाला पदच्युत केल्याचा जाहीरनामा काढला आणि स्वतः सिंहासनारोहण केले. पण औरंगजेबाने कपटाने भेद केला व रजपुतांना त्याच्यापासून फोडले. तेव्हा अकबर दक्षिणेत संभाजी राजांच्या आश्रयास आला (१-६-१६८१). आता ही संधी फार मोठी होती. हिचा बरोबर फायदा घेऊन संभाजी महाराज बादशहावर चालून गेले असते तर फारच फायदा झाला असता. मुख्य म्हणजे मुसलमानांत फूट पडली असती. अनेक सरदार आणि कदाचित अकबराचे भाऊही, बादशहाविरुद्ध उठले असते, अकबराला मिळाले असते आणि रजपुतांनी याच वेळी उठाव केला असता. यामुळे औरंगजेबाला दक्षिणेत उतरणेही कदाचित शक्य झाले नसते. पण छत्रपती संभाजी यांनी हे साहस केले नाही. प्रथम हे औरंगजेबाचे कपटच आहे, असा त्यांना संशय आला. अकबर कोकणात बादशहासारखा राहू लागला व त्याने फौजही उभी केली, त्यामुळे तो संशय बळावला. पुढे तो नाहीसा झाला तेव्हा, वर सांगितल्याप्रमाणे, स्वराज्यावरच आक्रमण आले होते. अशाही स्थितीत संभाजी महाराजांनी रजपुतांना उठविण्याचा प्रयत्न चालविला होता. पण त्यातून काही निष्पन्न झाले नाही.
 मोगली राज्यात दुफळी पाडून बादशहाला नामोहरम करण्याची ही एक फार मोठी संधी आली होती. शिवछत्रपतींनी ती नक्कीच साधली असती. आणि त्या चढाईमुळे भारताचा सर्व इतिहासच कदाचित बदलला असता. संभाजी महाराजांना या संधीचा फायदा घेता आला नाही हे खरे; पण यातून फार तर येवढेच म्हणता येईल की शिवछत्रपतींची दूरदृष्टी, त्यांचे असामान्य साहस, मुत्सद्देगिरी हे गुण संभाजी महाराजांच्या ठायी नव्हते. हे म्हणणे निराळे, आणि सर्वस्वी नाकर्तेपणाचे, विलासीपणाचे आरोप त्यांच्यावर करणे निराळे. नव्या संशोधनाअन्वये ते आरोप टिकत नाहीत.