पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
४७४
 

मस्तखानाने कोकणात उतरून कल्याण पुन्हा घेतले. नाशिकच्या बाजूस खान जहान शिरला होता. दोन्ही ठिकाणी मराठ्यांनी प्रतिकार केला. पण त्यांचा पराभव झाला. तरीही गोवळकोंड्यापासून चांद्यापर्यंत मराठी फौजा या वेळी सारख्या दौडत होत्या; आणि मोगली फौजांचे अन्नपाणी तोडून, त्यांवर अचानक छापे घालून त्यांना हैराण करीत होत्या.
 याच काळात सिद्दीशी मराठे लढत होते. सिद्दीचा जंजिरा घेण्यात त्यांना यश आले नाही व त्याचा पक्का बंदोबस्तही करता आला नाही हे खरे. पण त्याला त्यांनी वचक बसविला होता. पोर्तुगीजांच्या बाबतीत मराठ्यांना यापेक्षा जास्त यश आले. फोंड्याचा वेढा त्यांनी मारून काढला आणि कुंभारजुवे हे घेऊन साष्टीवारदेश त्यांनी मारला. याच वेळी गोव्यावर चालून जाण्याचा संभाजी महाराजांचा संकल्प होता. पण शहा आलमची फौज रामघाटातून येत आहे असे कळल्यामुळे त्यांना तो रद्द करावा लागला.

मोगल-नामुष्की
 शहा आलमशी मराठ्यांनी कसा मुकाबला केला ते पाहिले म्हणजे मराठ्यांचे तेज मुळीच लोपले नव्हते हे ध्यानात येईल. साठ हजार पायदळ, चाळीस हजार स्वार, वीस हजार उंट व दोन हजार हत्ती अशी प्रचंड फौज घेऊन शहाजादा, गोव्याच्या अलीकडे डिचोलीजवळ उतरला (जाने. १६८४). त्या फौजेसाठी धान्यसामग्री घेऊन मोगलांची १२० गलबते गोव्यास आली. पण, संभाजी आपला सूड घेईल असे वाटल्यावरून, पोर्तुगीजांनी ती सामग्री शहा आलमला दिली नाही. तेव्हा चिडून जाऊन गोवा प्रांतात व कुडाळ, बांदा, मालवण या भागात तो नासधूस करू लागला. मार्च महिन्यात शहाबुद्दिनखान शहाजाद्याला मिळण्यासाठी उत्तर कोकणातून येऊ लागला. पण मराठ्यांनी त्या दोघांची गाठ पडू दिली नाही, तेव्हा हताश होऊन बादशहाचा हा लाडका शहाजादा परत फिरला. उन्हाळ्याचे दिवस, अन्नधान्य नाही आणि मराठे लोकांचे छुपे हल्ले. हजारो माणसे व जनावरे तडफडून मेली आणि भयंकर हाल सोसून, पदरात नामुष्की घेऊन, होते नव्हते ते सर्व घालवून, १६८४ च्या मे मध्ये अहमदनगर येथे तो बापापुढे येऊन दाखल झाला.

पागोटे काढले
 चार वर्षांच्या या मोहिमेत बादशहाला महत्त्वाचा असा एकही विजय मिळाला नाही. पहिल्या दोन वर्षांतच बादशहा निराश होऊ लागला. डोक्यावरचे पागोटे त्याने जमिनीवर रागाने आपटले व 'संभाजीचा पाडाव होईपर्यंत मी हे पागोटे पुन्हा घालणार नाही' असे तो म्हणाला, १६८३ च्या पावसाळ्यात तर तो भ्रमिष्ट होण्याची वेळ आली. ही मोहीम शहाजाद्यावर किंवा मोठ्या सरदारावर सोपवून परत दिल्लीला