पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४७३
स्वातंत्र्ययुद्ध
 


शहा आलम
 पोर्तुगीज आणि मराठे यांची ही फोंड्याची लढाई चालू असतानाच १६८३ च्या डिसेंबरात बादशहाने फार प्रचंड सरंजाम उभा करून शहाजादा शहा आलम यास रामघाटाने कोकणात रवाना केले. दुसरी फौज तयार करून शियाबुद्दिनखान पुण्यावर चालून गेला. आणि शहाजादा अजमशहा हा नाशिकच्या रोखाने निघाला. विजापूर गोवळकोंडा यांच्याकडून मराठ्यांना मदत येऊ नये म्हणून या बाजूला खान जहान याची नेमणूक बादशहाने केली आणि पोर्तुगीजांनाही निरोप धाडला की तुम्ही संभाजीशी कसून युद्ध करा. आमची फौज मदतीस येत आहेच. शहा आलमच्या येणाऱ्या या फौजेला धान्य व दारूगोळा पुरविण्याची जबाबदारी पोर्तुगीजांनी पत्करली.
 १६८० च्या एप्रिलपासून तब्बल चार वर्षे मराठ्यांच्या लहानशा स्वराज्यावर अशी ही आक्रमणे चालू होती. एकाच वेळी दोन दोन तीन तीन ठिकाणी स्वाऱ्या होत होत्या आणि विशेष म्हणजे मोगल, पोर्तुगीज व सिद्दी हे आक्रमक एकमेकांना सामील होते. सिद्दी तर बादशहाचा नोकरच होता. पण पोर्तुगीज नोकर नसले तरी औरंगजेबाचे हुकूम मोडणे त्यांना अशक्य होते. असे हे संगनमत असल्यामुळे या आक्रमणाला फार भयानक असे रूप प्राप्त झाले होते.
 या आक्रमणाला संभाजी महाराजांनी, मराठ्यांनी तोंड कसे दिले ?

कडवा प्रतिकार
 १६८० मध्ये बहादूरखानाने अहिवंत किल्ल्याला वेढा घातला. पण मराठ्यांनी यशस्वीपणे तोंड दिल्यामुले त्याला तो वेढा उठवावा लागला. १६८१ च्या अखेरीस साल्हेरच्या वेढ्याची तीच गत झाली. हा किल्ला पुढे पाच वर्षे मोगलांच्या हाती लागला नाही. १६८६ च्या अखेरीस हा किल्ला पडला आणि तोही फितुरीमुळे ! १६८२ च्या एप्रिलात शहाबुद्दिनाने रामशेजला वेढा घातला होता. तोही किल्ला पडला नाही. तो पडला १६८७ साली आणि तोही फितुरीने ! पण केवळ बचावाचे धोरण अवलंबूनच मराठे स्वस्थ बसले नव्हते. बहादूरखान अहिवंताच्या परिसरात असतानाच सेनापती हंबीरराव मोहिते याने धरणगाव लुटून बऱ्हाणपुरावर चाल केली व भोवताली लुटालूट करून लाखो रुपयांची मत्ता पैदा केली. याच वेळी संभाजीमहाराजांनी दुसरी एक मोठी फौज अहमदनगर पैठण मार्गाने औरंगाबादेवर धाडली. या झाल्या मुख्य फौजा. शिवाय मराठ्यांच्या अनेक टोळया मोंगली मुलखात शिरून तो प्रदेश उद्ध्वस्त करीत होत्या. १६८१ साली नेताजी पालकर बागलाणात शिरला व तेथे उच्छेद करू लागला. दुसरी एक फौज सोलापुरावर व तिसरी साल्हेरकडे चालून आली.
 १६८२ च्या प्रारंभी हसन अल्लीने कोकणात उतरून कल्याण काबीज केले. पण त्याची पाठ वळताच मराठ्यांनी ते परत घेतले. याच साली नोव्हेंबर महिन्यात रण-