पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
२३
महाराष्ट्राची पृथगात्मता
 

(३) शब्दसिद्धीचे खालील प्रकार यादव मराठीने अपभ्रंशातून घेतले आहेत. बहुतेक सर्व तद्धित प्रक्रिया; पण, पें, ए, ई, इव या प्रत्ययांनी झालेली भाववाचक नामे ; ध्वन्यनुकारी शब्द; बरेचसे द्विरुक्त शब्द; नामधातू व क्रियानामे. यावरून यादव मराठीतील शब्दसिद्धीच्या ६ विशेष प्रकारांपैकी ४ प्रकार अपभ्रंशातून आलेले आहेत.
 महाराष्ट्री अपभ्रंशातून यादव मराठीत उतरलेले हे विशेष पाहिले म्हणजे एवढे स्पष्ट दिसते की यादव मराठीची उच्चारप्रक्रिया, प्रत्ययप्रक्रिया आणि शब्दसिद्धी या सर्वस्वी अपभ्रंशाच्या पुढची पायरी म्हणजे उत्क्रान्त अवस्था दर्शवितात. अपभ्रंशात नसलेल्या महाराष्ट्री प्राकृताच्या सहाच बाबी यादवमराठीत आहेत. पण तेवढ्यावरून मराठी ही साक्षात महाराष्ट्रीपासून निघाली असे म्हणता येत नाही. पैशाची मागधी यांचे काही विशेष मराठीत दिसतात. पण तेवढ्यावरून मराठीच्या त्या जननी असे म्हणता येत नाही. अपभ्रंशाची वर्णप्रक्रिया व प्रत्ययप्रक्रियाच मराठीत अवतरली असता तिचा उगम दुसरीकडे शोधण्याचे कारण नाही. एतावता यादव- मराठी ही महाराष्ट्री अपभ्रंशापासून निघाली हे स्पष्ट आहे.

अखंड पृथगात्मता
 मराठीची ही पूर्वपीठिका ध्यानी घेतली तर आज आपण जिला महाराष्ट्र म्हणतो त्या भूमीला इ. स. पूर्व चौथ्या-पाचव्या शतकापासून पृथगात्मता प्राप्त झाली होती असे दिसून येईल. महाराष्ट्री या भाषेमुळे त्या वेळी हा भूप्रदेश व येथला समाज पृथगात्म झाला होता. त्या महाराष्ट्री भाषेचाच अपभ्रंश म्हणजे महाराष्ट्री अपभ्रंश होय. ही भाषा महाराष्ट्रातच इ. सनाच्या चौथ्या पाचव्या शतकात जन्माला आली आणि तिच्यापासूनच नवव्या-दहाव्या शतकात मराठीचा जन्म झाला. म्हणजे इ. स. पूर्व पाचव्या शतकापासून पुढे या भूमीच्या पृथगात्मतेला केव्हाही खंड पडला नाही. समाजाला पृथगात्मतेची जाणीव जशी तीव्र होत जाते, तसतसे त्याचे कर्तृत्व विकसत जाते. महाराष्ट्रात हेच घडले. येथे सातवाहन घराण्यासारखे साम्राज्यकर्ते घराणे इ. पू. तिसऱ्या शतकात उदयास आले. आणि वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव यांनी ती पराक्रमाची परंपरा दीड हजार वर्षे टिकविली. याच काळात विद्या, कला, साहित्य या संस्कृतीच्या प्रधान अंगांचाही येथे विकास झाला. हा सर्व इतिहास आता पहावयाचा आहे पण त्यापूर्वी महाराष्ट्र हे नामाभिधान कसे पडले व ही भूमी, येथला समाज व येथले साहित्य यांचा अभिमान येथे कसा विकसत गेला हे पाहणे अवश्य आहे.