पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
४७०
 

त्याच्या बरोबर शहा आलम, अजन शहा, कामबक्ष हे त्याचे पुत्र बहादूरखान, शिवाबुद्दिनखान, हसनअल्ली, खावजहान, रणमस्तखान, रुहुल्लाखान, दिलेरखान, वजीर आसदखान यांसारखे मोठमोठे सरदार; चार पाच लाख लष्कर, भरपूर तोफा व दारूगोळा; असा प्रचंड, पोस्त सरंजाम त्याने आणला होता. शिवाजीच्या मृत्यूनंतर त्याने स्थापलेले स्वराज्य आपण चुटकीसरसे नष्ट करू, नंतर विजापूर व गोवळकोंडा येथील शियापंथी शाह्या जिंकू आणि मोगली साम्राज्याचे पूर्वजांचे स्वप्न साकार करून दाखवू, अशी फार मोठी उमेद धरून तो दक्षिणेत उतरला होता. हे सर्व कार्य अल्पावधीत, दोन चार वर्षांत, फार तर सात आठ वर्षांत उरकून, दिल्लीला परत जावयाचे असा त्याचा संकल्प होता.
 पण औरंगजेब दिल्लीला परत जाऊ शकला नाही. पंचवीस वर्षे सतत युद्ध करूनही त्याला अपेक्षेच्या शतांशही यश आले नाही. त्याचे सर्व मनोरथ धुळीस मिळाले, आणि पूर्ण निराश होऊन १७०७ च्या फेब्रुवारी महिन्यात तो कालवश झाला.

तेव्हा आणि आता
 या आधीच्या सातशे वर्षाच्या काळात भारतावर- उत्तर भारतावर, दक्षिण भारता वर, पूर्व भारतावर, पश्चिम भारतावर- मुस्लिमांच्या सारख्या स्वाऱ्या होतच होत्या. त्या स्वाऱ्या आणि ही औरंगजेबाची स्वारी यांची तुलना केली तर काय दिसेल ? अकराव्या शतकाच्या पहिल्या चतुर्थात गझनीच्या महंमदाने हिंदुस्थानवर सतरा स्वाऱ्या केल्या. एकदाही त्याचा पराभव झाला नाही ! पुढच्या तीनशे वर्षात मुसलमानांनी सर्व उत्तर हिंदुस्थान पादाक्रांत केला. चौदाव्या शतकाच्या प्रारंभी अल्लाउद्दिन व मलिककाफूर यांनी पाचसहा स्वाऱ्यांत सर्व दक्षिण हिंदुस्थान— तेथील सर्व मोठमोठी राज्ये धुळीस मिळविली. पुढे महाराष्ट्रात हसन गंगू आला आणि त्याने अगदी सहजगत्या येथे स्वतंत्र राज्य स्थापिले. आणि तीनशे वर्षे हिंदूंना, मराठ्यांना गुलामगिरीत ठेविले. अशी ही पूर्वीची स्थिती. एकेका स्वारीत एकेक दोन दोन राज्ये मुस्लिम बादशहा किंवा सेनापती सहज उद्ध्वस्त करीत असत. आणि आता ! मुस्लिमांचा सर्वात मोठा, सर्वात बलशाली बादशहा दिल्लीच्या सर्वसामर्थ्यानिशी दक्षिणेत उतरला होता आणि पंचवीस वर्षे, पाव शतक, लढाया करीत होता. त्याला काय मिळाले ? व्हिन्सेंट स्मिथ म्हणतो, 'महाराष्ट्राने औरंगजेबाच्या देहावरच थडगे रचले नाही तर त्याच्या साम्राज्यावरही !' यदुनाथ सरकार म्हणतात, 'महाराष्ट्राने केवळ औरंगजेबाचेच कार्य नव्हे, तर त्याच्या पूर्वजांचे कार्यही, शून्यवत करून टाकले.'
 हे एवढे बळ, हे अद्भुत सामर्थ्य मराठ्यांना कोठून प्राप्त झाले ? त्या एवढ्या बलशाली शत्रूवर त्यांनी जय कसा मिळविला ? हे शिवछत्रपतींचे देणे आहेत, हा त्यांचा वारसा आहे, हे उघडच आहे. हा वारसा त्यांनी कसा चालविला हे आता पाहावयाचे आहे.