पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



२४.
स्वातंत्र्ययुद्ध
 



 मराठा कालातील महाराष्ट्राच्या संस्कृतीचे स्वरूप आपण अभ्यासीत आहो. या मराठा कालाचे साधारणपणे तीन खंड होतात. १६४५ ते १६८० हा पहिला शिवछत्रपतींचा कालखंड होय. १६८१ ते १७०७ हा दुसरा स्वातंत्र्य युद्धाचा कालखंड होय. यालाच अलीकडे जनतायुद्ध असे म्हणतात. आणि १७०७ ते १८१८ हा तिसरा पेशवाईचा कालखंड होय.
 

यातील पहिल्या कालखंडातील संस्कृतीच्या विविध अंगांचा विचार आपण गेल्या पाच लेखांत केला. शिवछत्रपतींनी फार मोठे धर्मपरिवर्तन घडविले, काही नवी अर्थव्यवस्था अमलात आणली, या देशाला राष्ट्रधर्माची दीक्षा दिली आणि नवी युद्धविद्या जनतेला शिकवून या महाराष्ट्रभूमीत स्वराज्याची स्थापना केली. पण या कालातील विद्वज्जनांनी त्यांच्या कार्यामागचे नवे तत्त्वज्ञान ग्रंथरूपाने लोकांपुढे मांडण्याचे व जनमानसात ते बिंबविण्याचे कार्य केले नाही; म्हणून छत्रपतींच्या हिंदवी स्वराज्याच्या ज्या आकांक्षा होत्या त्या व्हाव्या तशा सफल झाल्या नाहीत, असा त्या विवेचनाचा इत्यर्थ आहे.
 आता 'स्वातंत्र्ययुद्ध' हा जो दुसरा कालखंड त्याचा अभ्यास करावयाचा आहे.

औरंगजेब-आकांक्षा
 मोगल बादशहा औरंगजेब हा १६८२ च्या मार्च महिन्यात औरंगाबादेस येऊन पोचला. काबूलपासून कन्याकुमारीपर्यंत एकछत्री मोगल सत्ता प्रस्थापित करावयाची आणि सर्व हिंदुस्थान इस्लामधर्मी करून टाकावयाचा, अशी त्यांची आकांक्षा होती.