पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
४६८
 

क्रांतीची बीजे या भूमीत पेरली तरी अवश्य ते खतपाणी न मिळाल्यामुळे ती रुजली नाहीत, त्यांना विरूढी फुटली नाहीत, त्यांना कोंब आले नाहीत. पश्चिम युरोपातल्या इंग्लंड, फ्रान्स या देशांप्रमाणे महाराष्ट्र बलसंपन्न आणि ऐश्वर्यशाली का झाला नाही याची कारणमीमांसा ही अशी आहे.
 महाराष्ट्र-संस्कृतीचा इतिहास सांगताना, बहामनी कालानंतर मराठा कालाच्या, मराठा युगाच्या विवेचनास आपण प्रारंभ केला. आणि प्रथम या युगाचे आद्यप्रवर्तक जे शिवछत्रपती त्यांच्या कार्याचे येथवर विवेचन केले. त्यावरून हे दिसून येईल की त्यांनी महाराष्ट्राच्याच नव्हे, तर भारताच्या इतिहासालाही नवे वळण लावले, त्या इतिहासातही नवे युग निर्माण केले. त्यांच्या नंतरच्या राज्यकर्त्यांच्या ठायी त्यांच्यासारखी प्रज्ञा नव्हती, तसे कर्तृत्व नव्हते. पण मराठा समाजात एक नवे चैतन्य निर्माण झाले होते यात शंकाच नाही. त्याच बळावर, आपल्या सर्वसामर्थ्यानिशी दक्षिणेत उतरलेल्या औरंगजेबाचे भारताच्या इस्लामीकरणाचे स्वप्न त्यांनी धुळीस मिळविले आणि माेगली सत्तेचा कणाच मोडून टाकला. आणि त्याच बळावर पुढे मराठ्यांनी आपल्या स्वराज्याचे साम्राज्य केले. अशा या पुढल्या काळातल्या महाराष्ट्रसंस्कृतीचा, तिच्या राजकीय, आर्थिक, धार्मिक, सामाजिक अंगांचा इतिहास आता पाहावयाचा आहे.