पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
४६२
 

मान हा राष्ट्रनिष्ठेचा आत्मा होय. पण दुर्दैव असे की इतिहास लिहून या परंपरेचे ज्ञान जतन करून ठेवावे, हा उद्योगसुद्धा भारतात कोणी केला नाही. चंद्रगुप्त, समुद्रगुप्त, विक्रमादित्य, हर्ष, सातवाहन असे महापराक्रमी राजे भारतात होऊन गेले, याचा उल्लेख, अकराव्या बाराव्या शतकानंतरच्या वाङ्मयात चुकून सुद्धा केलेला आढळत नाही. वेरूळ, अजंठ्याची लेणी सातव्या आठव्या शतकात पूर्ण झाली होती. पण इंग्रज येथे येईपर्यंत अशी काही लेणी आहेत, याचा भारतीयांना पत्ताच नव्हता. तीर्थे कोठे आहेत, देवळे कोठे आहेत, साधुसंन्यासी यांचे मठ कोठे आहेत, याची बारीकसारीक माहिती सर्व भारतीयांना होती. कारण त्यांचा मोक्षाशी, परलोकाशी संबंध होता. त्यामुळे अंतसमय मुखाचा होणार होता. चंद्रगुप्त, समुद्रगुप्त किंवा वेरूळ अजंठा यांच्यामुळे तो लाभ होणार नव्हता. त्यांच्यामुळे ऐहिक सुखाचा लाभ कदाचित झाला असता, पण ते तर विषवत् त्याज्य होते. मग त्या प्राचीन परंपरेचा इतिहास जतन करून ठेवण्याचे प्रयोजन काय ? राष्ट्रभावनेच्या परिपोषासाठी इतिहासाप्रमाणेच, राजनीतिशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, या विषयांवर ग्रंथ व्हावे लागतात. युरोपात तेराव्या शतकापासून असे ग्रंथ होऊ लागले होते. पण भारतात तसे झाले नाहीत. येथील लोकांना तशी प्रज्ञाच नव्हती असे नाही. ते याविषयी उदासीन होते. याचे महत्त्वच त्यांना वाटत नव्हते; कारण ते ऐहिक विषय होते. ते लिहून मोक्ष मिळणार नव्हता. त्या वेळचे शास्त्रीपंडित कशात गुंतले होते, हे मागे सांगितलेच आहे. व्रतवैकल्ये, श्राद्धपक्ष, प्रायश्चित्ते, हे त्यांचे आवडते विषय होते. हे बहामनी काळाविषयी झाले. पुढे शिवकाल आला. समर्थांनी ग्रंथ लिहून आणि छत्रपतींनी प्रत्यक्ष कार्य करून नव्या प्रेरणा दिल्या. पण शास्त्रीपंडितांच्यावर त्याचा काही परिणाम झाला काय ? गागाभट्ट, नीलकंठ चतुर्धर, रघुनाथ गणेश यांनी कोणते ग्रंथ लिहिले? मीमांसा कुसुमांजली, दिनकरोद्योत, आचारप्रदीप, भोजन- कुतूहल, धर्मामृतमहोदधी हे त्यांचे ग्रंथ. यांचे विषय वरील विषयांपेक्षा फारसे निराळे नाहीत. यांतले बहुतेक पंडित तीर्थयात्रा, शास्त्रचर्चा या निमित्ताने भारतभर भ्रमण करीत असत. पण मुस्लिमांचा, रजपुतांचा, विजयनगरचा इतिहास लिहावा, परकीय आक्रमकांचे स्वरूप, त्यांचे बलाबल या विषयावर लिहावे, असे त्यांना कधी वाटले नाही. मुस्लिम पंडितांनी असले लेखन केले आहे. इंग्रज प्रवाशांनी केले आहे. पण भारतीय पंडितांना ही बुद्धी झाली नाही, कारण या विषयांचा इहलोकाशी संबंध आहे, म्हणून हे विषय त्यांना वर्ज्य होते. निवृत्ती, मायावाद, परलोकनिष्ठा यांमुळे समाज कसा मृतवत होऊन जातो हे यावरून कळेल असे वाटते.

व्यापारी वर्ग
 समाजप्रबोधन करणे हे प्रामुख्याने मध्यमवर्गाचे कार्य. तो वर्गच येथे निर्माण झाला नाही. त्यामुळे राष्ट्रनिष्ठेचा परिपोष येथे झाला नाही. राष्ट्रनिष्ठेचा आणि ऐहिक ऐश्वर्याचा