पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४६१
यशापयश-मीमांसा
 

लोकांच्या मनात राहणे शक्यच नव्हते. संसारात राहावे, वनात जाऊ नये, असे यांतील अनेकांनी सांगितले आहे हे खरे. पण, धर्मशाळेत घडीभर राहातो तसे राहावे, त्याबद्दल कसलेही प्रेम मनात ठेवू नये, स्त्रीपुत्रांबद्दल कसलीही माया चित्तांत येऊ देऊ नये, त्यांच्याबद्दल घृणाच मनात असावी, मोक्ष, परलोक यांच्या मार्गात येणारे हे आपले वैरी आहेत हे सतत ध्यानी बाळगावे, असा उपदेश त्यांनी केला आहे. तो मनात ठसल्यावर, वीस वीस वर्षे ताऱ्यांचे वेध घेत राहावे, तपेच्या तपे वनस्पतींचे संशोधन करण्यात घालवावी, अनेक कागदपत्रे पाहून, दीर्घ अभ्यास करून आपल्या देशाचा इतिहास लिहावा, उत्तरधृवावर जावे, दक्षिण धृवाचा शोध घ्यावा, ही उभारी लोकांच्या चित्तांत कशी राहावी ? कारण हा सर्व अभ्यास या जगाचा आहे आणि ते जग तर क्षणभंगुर आहे, क्षणिक आहे, त्याचा घडीचाही भरंवसा नाही, त्याच्याबद्दल अगदी उत्तम ज्ञान झाले तरी त्याचा उपयोग काय ? स्त्रीपुत्रांचा अंतसमयी जसा उपयोग नाही, म्हणून त्यांची चिंता वाहणे हा जसा मूर्खपणा होय, तसाच या ज्ञानाचा अंतसमयी उपयोग नसल्यामुळे त्याचा हव्यास धरणे हा मूर्खपणाच होय. शाश्वत असा जो आत्मा, चिरंतन असे जे हरिचरण त्यांचे ज्ञान हेच मानवाचे प्राप्तव्य होय. म्हणून या जगाचा, तेथील ऐश्वर्याचा सर्व मोह सोडून, हरिनामस्मरण करीत कालक्रमणा करावी, यातच जन्माला आल्याचे साफल्य आहे, हे तत्त्वज्ञान पुराणे, कीर्तने, प्रवचने यांतून अहोरात्र ज्या लोकांच्या मनात बिंबवले जाते, त्यांच्या हातून ऐहिक ऐश्वर्याच्या कसल्याही क्षेत्रात पराक्रम होणे शक्य नाही. भारतात अनेक शतके हेच घडत होते. सातव्या आठव्या शतकाच्या आधी, भारतात ऐहिक ऐश्वर्याचे सर्व उद्योग होत होते. गणित, रसायन, पदार्थविज्ञान, वैद्यक इ. सर्व भौतिक विद्यांचा अभ्यास येथे होत होता. राज्य, साम्राज्य, व्यापार, उद्योग, कला, या क्षेत्रांतले सर्व उद्योग लोक करीत होते. आणि त्यामुळे भारत हा ऐश्वर्यसंपन्न झाला होता. तेथून पुढे या सर्वांना हळूहळू उतरती कळा लागली त्याचे प्रधान कारण निवृत्ती हे होय.

मध्यम वर्ग नाही
 राष्ट्रभावना जोपासणे, लोकांच्या मनात ती रुजविणे, तिच्या सर्व अंगोपांगांचे विवेचन करणे, हे सर्व बुद्धिजीवी मध्यम वर्गाचे कार्य होय. वर सांगितलेले शास्त्र- संशोधक, ग्रंथकार, तत्त्ववेत्ते, मानवतावादी पंडित हे सर्व या मध्यम बुद्धिजीवी वर्गात येतात. राष्ट्रसंघटनेच्या सर्व कार्यात हा वर्ग नेतृत्व करीत असतो. पण हे उद्योगच भारतात कोणी न केल्यामुळे हा वर्ग येथे निर्माणच झाला नाही आणि त्याच्या अभावी काही काळ उदयास अलेली राष्ट्रभावना येथे मूळ धरू शकली नाही.

इतिहास- उपेक्षा
 एक साधी गोष्ट पाहा. प्राचीन परंपरेचा, त्या परंपरेतील मानवी कर्तृत्वाचा अभि