पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४६३
यशापयश-मीमांसा
 

परिपोष करणारा दुसरा वर्ग म्हणजे व्यापारी वर्ग होय. प्रोटेस्टंट पंथाच्या उदयानंतर पश्चिम युरोपातील व्यापारी वर्ग संघटित व प्रबळ झाला; आणि त्याने राजसत्तेवर वर्चस्व स्थापून सर्व जीवनातच क्रांती घडविली. हे व्यापारी केवळ व्यापारी नव्हते, ते राजकारणी होते, लढवय्ये होते, साम्राज्यकर्ते होते. त्यांनी आपल्या देशाच्या संरक्षणाला अवश्य ते धन निर्माण केले, शस्त्रास्त्रे उभारली व धनोत्पादनाला अवश्य ते विज्ञान पैदा करण्यासाठी विद्यापीठांना चालना दिली. म्हणजे त्यांनी एक नवी अभिनव अशी व्यापारी संस्कृतीच निर्माण केली. पोपच्या धर्माविरुद्ध बंड करण्यातही ते प्रमुख होते. सरंजामदारांचा पाडाव त्यांनीच केला आणि राष्ट्रीय राजसत्तेला त्यांनीच पाठिंबा दिला.

मराठा वैश्य ?
 प्राचीन काळी भारतात व्यापारी वर्ग हा फार प्रबळ व संपन्न असा होता. पण पुढे त्यालाही उतरती कळा लागली आणि महाराष्ट्रातला व्यापारी वर्ग तर बहामनी काळात, दुर्गादेवीच्या दुष्काळात समूळ नाहीसाच झाला. या काळात सर्वच वर्ग उत्सन्न झाले होते. पण वतनदार, सरदार पुन्हा सावरले, शेतकरी पूर्ववत शेती करू लागला. पण अत्यंत दुर्दैवाची गोष्ट ही की या वेळी मराठा वैश्य जो नाहीसा झाला तो कायमचा ! त्यानंतर गुजराथी व मारवाडी वैश्ववाणीवर्ग महाराष्ट्रात आला आणि त्याने येथला सर्व व्यापारधंदा चालविला. तसाच उद्योग मराठा वैश्यवर्गालाही करता आला असता. पण तो वर्ग खचला तो खचलाच, आणि तेव्हापासून आजपर्यंत महाराष्ट्राचा व्यापार आणि उद्योग हा सर्व अमहाराष्ट्रीय लोकांच्या हाती गेलेला आहे.

साहुकार
 शिवछत्रपतींनी व्यापाराला उत्तेजन देण्याचे पराकाष्ठेचे प्रयत्न केले होते. रामचंद्रपंत अमात्य यांनी 'आज्ञापत्रा'त छत्रपतींच्याच धोरणाचे विवेचन केले आहे. त्यावरून हे दिसून येईल. ते साहुकारांचे महत्त्व सांगतात. पण त्या वर्णनावरून स्वच्छ दिसते की साहुकार म्हणताना त्यांच्या मनात व्यापारीच आहेत. 'साहुकार म्हणजे राज्याची शोभा. त्यांच्या योगे राज्य अबादानसमृद्ध होते. न मिळे त्या वस्तुजात राज्यात येतात. संकटप्रसंगी कर्जवाम मिळते. याकरिता साहुकारांचा बहुमान चालवावा. पेठापेठात दुकाने, वखारी घालवून हत्ती घोडे, रेशमी वस्त्रे, जरीची वस्त्रे, लोकरी वस्त्रे, आदिकरून वस्त्रजात, तसेच रत्ने, शस्त्रे आदिकरून अशेष वस्तुजात यांचा उदीम व्यापार चालवावा. हुजूर बाजारामध्येही थोर थोर साहुकार आणून ठेवावे.' हे वर्णन केवळ व्याजबट्टा करणाऱ्या सावकाराचे नाही. व्यापारी सावकरांचे आहे. पुढे नवव्या प्रकरणात आरमाराचे महत्त्व सांगताना, समुद्रावरील व्यापाऱ्यांना असेच उत्तेजन संरक्षण द्यावे, असे अमात्यांनी सांगितले आहे. 'कोळी साहुकारांचे वाटेस जाऊ नये. प्रायोजनिक वस्तू परस्थळीहून आणावी तेव्हा येते. यात राज्याचा भ्रम काय उरला. ?'