पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
४६०
 

हेच व्रत पुढे चालविले आणि तमोयुगातून युरोपला मुक्त केले. मुक्त प्रज्ञा, स्वतंत्र निर्णयशक्ती, इहवाद, याच्या जोडीला सहिष्णुता, उदारमतवाद, समता, सामजिक न्याय, सर्वधर्मसमानत्व, प्रवृत्तिवाद, आशावाद यांचाही ते जोराने पुरस्कार करीत. या पंडितांत इरॅसमस हा मुकुटमणी असून सर्व पश्चिम युरोपाने त्याला गुरू मानले होते.

छापखाना
 पेट्रार्कपासून इरॅसमसपर्यंत ग्रीक विद्येच्या प्रसाराचे जे कार्य सर्व पंडितांनी चालविले होते त्याला मोठा वेग आला तो मुद्रणकलेच्या शोधामुळे. जोहान गटेंबर्ग (१३९४- १४६८) या जर्मन तरुणाने हा शोध लावला. जर्मन मुद्रकांना छापखाना ही मोठी शक्ती आहे, क्रांतिकार्यात तिचे स्थान निस्तुळ आहे, असे वाटत असल्यामुळे मिशनऱ्यांच्या कर्तव्यबुद्धीने त्यांनी सर्व युरोपभर आपली कला पसरून दिली आणि पंधराव्या शतकाच्या अखेरपर्यंत ९० लक्ष पुस्तके छापून काढली.

पाश्चात्यांपुढे !
 बाराव्या तेराव्या शतकात फ्रेंच, जर्मन, इटालियन, इंग्लिश या भाषा प्रौढरूपाला आल्या आणि त्यातूनच आपण फ्रेंच, आपण जर्मन अशी स्वतंत्र राष्ट्रीय अस्मिता निर्माण झाली. या राष्ट्रभावनेचा परिपोष ग्रीक विद्येतील व्यक्तिवाद, बुद्धिस्वातंत्र्य, समता या तत्त्वांनी होऊन पश्चिम युरोपीय देश बलाढ्य व ऐश्वर्यसंपन्न झाले. भारतात त्याच सुमाराला प्रांतीय भाषा प्रौढ झाल्या होत्या. तरीही येथे स्वतंत्र राष्ट्रीय अस्मिता निर्माण झाली नाही. महाराष्ट्रात शिवसमर्थांच्या कार्यामुळे ती काही प्रमाणात उदयास आली होती. पण ग्रीक विद्येसारख्या भौतिक विद्यांचा प्रसार येथे झाला नाही. येथे शास्त्रज्ञ निर्माण झाले नाहीत, येथे जगप्रवास कोणी केला नाही, इहवादी तत्त्वज्ञान येथे कोणी सांगितले नाही, व्यक्तिस्वातंत्र्य, बुद्धिप्रामाण्य, समता यांची प्रवचने येथे कोणी केली नाहीत. शिवसमर्थांच्या कार्यामुळे जे चैतन्य, जी प्राणशक्ती येथे निर्माण झाली होती तिच्यामुळे मुस्लिम सत्तेचे निर्मूलन करण्याचे सामर्थ्य मराठ्यांना प्राप्त झाले. पण वरील गुणांनी संपन्न असे जे पाश्चात्त्य लोक त्यांच्याशी गाठ पडताच त्यांचा टिकाव लागला नाही, लागणे शक्यच नव्हते.

निवृत्ती
 वरील प्रकारचे समाजप्रबोधन येथे झाले नाही याचे प्रधान कारण म्हणजे निवृत्ती. आद्य शंकराचार्यापासून पुढील सर्व आचार्य आणि भारतातल्या सर्व प्रदेशांतले संत यांनी, जग हे असार आहे, माया आहे, क्षणभंगुर आहे, हा संस्कार शतकानुशतके भारतीयांच्या मनावर करण्याचे व्रतच घेतले होते. या थोर पुरुषांनी संसाराची जी भयानक वर्णने केली आहेत, ती कानी पडल्यावर, या संसाराबद्दल कसलीही उभारी