पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
२१
महाराष्ट्राची पृथगात्मता
 

आणखी एक सबळ पुरावा दिला आहे. तो म्हणजे मराठी भाषेच्या नावाचा. ज्ञानेश्वरकालीन वाङ्मयात काही वेळा मऱ्हाटा हा शब्द सोपा, साधा, या अर्थी येतो व तसाच तो मराठी भाषा या अर्थीही येतो. यावरून मऱ्हाटी या शब्दाला केवळ भाषावाचक अर्थ त्या वेळी आलेला नव्हता. तो हळूहळू येत होता असे दिसते. या तर्काला पुष्टी देणारा दुसरा पुरावा असा की पुष्कळ वेळा तत्कालीन ग्रंथांत मराठीचा 'देशी' अथवा 'देशी भाषा' असा उल्लेख केलेला आढळतो. ज्ञानेश्वरी, उद्धवगीता, रुक्मिणी स्वयंवर ( नरेन्द्र ) या काव्यांत याची विपुल उदाहरणे आढळतात. आता मराठीचे 'देशी' हे नाव फार सूचक आहे. कारण अपभ्रंश भाषेला तिच्या कवींनी 'देशी' असेच नाव दिले आहे. शास्त्रीय ग्रंथांत तिला अपभ्रंश हे नाव रूढ असले तरी कवी बहुधा तिचा 'देसी भासा ', 'देसभास', ' देसिल' असा उल्लेख करतात. तेव्हा ज्ञानेश्वर, भास्कर, नरेंद्र इ. प्राचीन मराठी कवी अपभ्रंशाचेच विकसित रूप वापरीत होते, आणि ते अगदी सहजक्रमाने घडत होते, असे म्हणण्यास प्रत्यवाय नाही. याच संबंधात आणखीही एक उपोद्बलक असा पुरावा सापडतो. अपभ्रंशाचे नागर, उपनागर व व्राचड असे तीन प्रमुख प्रकार मार्कंडेय या व्याकरणकाराने दिले आहेत. त्यांतील नागर अपभ्रंशापासून मराठीचा जन्म झाला असे म्हणता येईल. कारण आपली भाषा म्हणजे 'नागर बोल' आहेत असाही उल्लेख ज्ञानेश्वरी, वच्छहरण इ. ग्रंथांत कवींनी केला आहे. 'देशी' व 'नागर' अशी दोन नावे अपभ्रंश भाषेची त्या काळी रूढ होती. तीच नावे प्राचीन मराठी कवींनी मराठीला योजलेली आहेत. तेव्हा अपभ्रंश भाषेपासूनच मराठीचा जन्म झाला असे म्हणणेच जास्त सयुक्तिक आहे.

उत्क्रांत अपभ्रंश मराठी
  यासंबंधी अखेरचे निर्णायक व निःसंदिग्ध असे मत डॉ. शं. गो. तुळपुळे यांनी आपल्या 'यादवकालीन मराठी भाषा' या प्रबंधात दिले आहे. यादवकालीन मराठी हे मराठीचे प्रारंभीचे रूप होय. ती भाषा जर महाराष्ट्री अपभ्रंशापासून उत्पन्न झाली असे सिद्ध झाले तर संस्कृत, महाराष्ट्री, अपभ्रंश व मराठी अशी साखळी जोडली जाऊन महाराष्ट्राची पृथगात्मता इ. पू. तिसऱ्या चौथ्या शतकापासून निश्चित सिद्ध होते असे म्हणता येईल. डॉ. तुळपुळे यांनी हे महत्त्वाचे कार्य आपल्या प्रबंधात केले आहे. त्यांनी केलेले विवेचन साररूपाने पुढे देतो.
 " मराठी ही अनेक भाषांपासून निघाली असा सिद्धान्त कित्येक प्रतिपादितात; तसे नसून ती अपभ्रंशापासून निघाली हे माझे मुख्य म्हणणे आहे. यादव मराठीची वर्णप्रक्रिया व प्रत्ययप्रक्रिया या अपभ्रंश भाषेतून उत्क्रान्त झालेल्या दिसतात. म्हणजेच यादव मराठी ही अपभ्रंशापासून उत्पन्न झाली. मराठीतील काही बाबी अपभ्रंशात न आढळता महाराष्ट्रीत व काही थोड्या मागधी - शौरसेनीत आढळतात. तेवढ्यापुरते मराठीने अपभ्रंशाला सोडले असले तरी मुख्यतः अपभ्रंशाचाच सांगाडा जशाचा