पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४४७
शिवछत्रपतींची युद्धविद्या
 

इंग्रज, फ्रेंच यांच्याकडे मागितले. ते त्यांनी दिले नाहीत, तेव्हा स्वतःच आखणी व देखरेख करून, छत्रपतींनी तो किल्ला इतका उत्तम बांधला की तसा पाश्चात्य इंजिनियरांनाही बांधता आला नसता, असे फ्रेंच कागदपत्रांत म्हटले आहे. मोरोपंत, अनाजी दत्तो हेही पुढे या स्थापत्यविद्येत निष्णात झाले.
 रामचंद्र पंत म्हणतात, 'हे राज्य तर तीर्थरूप कैलासवासी थोरले स्वामींनी गडावरूनच निर्माण केले. जो जो देश स्वशासनवश न होय त्या त्या देशी स्थल विशेष पाहून गड बांधले, तसेच जलदुर्ग बांधले. त्यावरून आक्रम करीत करीत सालेरी अहिवंतापासून कावेरीतीरपर्यंत निष्कंटक राज्य संपादिले. औरंगजेबासारखा महाशत्रू चालून आला असताना...राज्यात किल्ले होते म्हणून अवशिष्ट तरी राज्य राहिले.'

आरमार
 गडकोट किल्ल्याप्रमाणेच नौदल किंवा आरमार हेही एक महत्त्वाचे राज्यांग आहे. 'ज्यांच्याजवळ आरमार त्यांचा समुद्र' असे अमात्यांनी म्हटले आहे आणि त्याचा प्रत्यय छत्रपतींना हरघडीस येत होता. इ. स. १५०० पासून पोर्तुगीजांची अप्रतिहत सत्ता पश्चिम समुद्रावर स्थापन झाली होती. निजामशाही, आदिलशाही एवढेच नव्हे, तर दिल्लीचे मोगलसुद्धा त्या सत्तेला आव्हान देऊ शकत नव्हते. त्यांची व्यापारी आणि यात्रेकरू जहाजे यांना समुद्रात शिरताना पोर्तुगिजांचा परवाना काढावा लागे. हे फार अपमानास्पद होते. पण त्या मोठ्या सत्तांचाही काही इलाज चालत नव्हता. याच किनाऱ्यावर राजापूरच्या समोर, जंजिरा किल्ल्यात सिद्दीने हळूहळू जम बसविला. आणि थोड्याच अवधीत इंग्रज व डच यांनीही आपल्या वखारी तेथे घालून त्यांच्या संरक्षणासाठी लहानशी आरमारेही सज्ज केली. यामुळे कारवारपासून सुरतेपर्यंतचा समुद्रकिनारा पाश्चात्यांच्या ताब्यात गेला.
 व्यापारी व यात्रेकरू जहाजे यांना अडवणे, त्रास देणे एवढाच पोर्तुगीज आणि सिद्दी यांचा उपद्रव नव्हता. सर्व कोकणपट्टीत ते हिंदूंचा अनन्वित छळ करीत. ते घरेदारे लुटीत स्त्रियांवर अत्याचार करीत, हजारो लोकांना पकडून अरबस्थानात नेऊन गुलाम म्हणून विकीत आणि हजारोंना सक्तीने बाटवीत. छत्रपतींनी हिंदवी स्वराज्याची घोषणा केली, तेव्हा कोकणची स्थिती अशी होती. साहजिकच आपले स्वतंत्र नौदल स्थापण्याचा त्यांनी तेव्हापासूनच निश्चय केला होता. सरदेसाई यांच्या मताप्रमाणे १६५३ सालीच महाराजांनी पद्मदुर्ग बांधला आणि त्यांनी स्वतःच एका पत्रात म्हटल्याप्रमाणे, 'पद्मदुर्ग बसवून राजापुराच्या उरावरी दुसरी राजापुरी केली.' पुढे मालवण येथे सिंधुदुर्ग बांधला. त्याचे वर्णन चित्रगुप्ताने असेच केले आहे, 'चौऱ्याऐंशी बंदरांत हा जंजिरा मोठा. अठरा टोपीकरांचे उरावर शिवलंका अजिंक्य जागा निर्माण केला.'