पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४४३
शिवछत्रपतींची युद्धविद्या
 

कार्यासाठी लागणारा पैसा मिळविण्याचा तो एक राजमार्ग होता. महाभारत आणि शुक्रनीती यांत राजाने हा मार्ग अवलंबिणे अवश्य आहे, असे स्पष्टपणे सांगितले आहे. महाभारतकार म्हणतात, 'सैन्य हे धर्माच्या प्रवृत्तीस मुख्य आधार असून धर्म हाच प्रजेचा आधार आहे. आणि कोश (धन) हा तर सैन्याचा आधारस्तंभ होय. हा कोश शत्रूला पीडा दिल्यावाचून कधी समृद्ध होत नाही. म्हणून प्रजापालनाच्या कामी द्रव्य संपादण्यासाठी हिंसा करावी लागली तरी राजाला त्यामुळे दोष लागत नाही.' (शांति. अ. १३०) शुक्रनीतीतही म्हटले आहे की 'राजाने वाटेल ती भयंकर कर्मे करून आपले गेलेले राज्य परत मिळवावे. आणि यासाठी शत्रूची सर्व संपत्ती लुटून आणावी.' (शुक्र. अ. १)

द्रव्यसंचय
 ही प्राचीन राजनीती अनुसरूनच महाराजांनी शत्रुप्रदेशातील धनाढ्य शहरांवर छापे घालून अपार द्रव्यसंचय केला. असे छापे घालण्यापूर्वी, त्या त्या शहरातील अधिकाऱ्यांना, व्यापाऱ्यांना, सावकारांना ते पत्रे धाडून कळवीत असत की तुम्ही आम्हांस सरकारी वसुलाच्या चौथ्या हिश्शाइतकी रक्कम, म्हणजेच चौथाई, जर बिनतक्रार दिली तर तुम्हांला आम्ही कसलाच त्रास देणार नाही. 'इंग्लिश रेकॉर्डस ऑन शिवाजी' या ग्रंथात सुरत, हुबळी, नंदुरबार येथील अधिकाऱ्यांना शिवाजीने अशी पत्रे पाठविली होती, हे नमूद केलेले आहे. ज्या शहरचे लोक त्यास चौथाई देण्याचे कबूल करतात, त्या शहरांना शिवाजी कधीही उपसर्ग देत नाही, असेही तेथे सांगितलेले आहे (भाग १, पृ. २१९, २२१. भाग २, पृ. २९७). मोगल, आदिलशाही यांनी आक्रमिलेला जो मुलूख सोडवून महाराज तेथे स्वतःची सत्ता स्थापन करीत तेथे तत्काळ उत्तम राज्यकारभार चालू करण्याची ते व्यवस्था करीत. कल्याण-भिवंडी या परगण्यांत त्यांनी तसे केल्याचे पाश्चात्य लेखकांनीच नमूद केले आहे. आणि जे त्यांनी कल्याण-भिवंडी येथे केले तेच सर्व महाराष्ट्रात आणि पुढे सर्व हिंदुस्थानात करावयाचे हे त्यांचे अंतिम उद्दिष्ट होते. याचाच अर्थ हिंदवी स्वराज्य ! अशा महत्कार्यासाठी सर्व प्रकारे साह्य करणे हे सर्व नागरिकांचे, व्यापाऱ्यांचे, सावकारांचे आद्य कर्तव्य होते. ते ज्यांनी केले नाही, त्यांच्याकडून बळाने धन वसूल करणे हे प्राप्तच होते. १६६४ साली महाराजांनी सुरतेतून प्रथम अशी वसुली केली आणि पुढच्या पंधरा वर्षात बऱ्हाणपूर, कारंजा, कारवार, हुबळी, नासिक, अथणी, धरणगाव, औरंगाबाद अशा सुमारे वीस शहरांवर छापे घालून स्वराज्यस्थापनेसाठी त्यांनी अपार धन मिळविले. आणि त्या धनाच्या साह्याने मोठी सेना उभारून स्वराज्याची स्थापना केली.