पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
४४२
 

घेतला आणि तो पुन्हा परत घेण्यासाठी खवासखान व मुधोळकर बाजी घोरपडे चालून येतात असे कळताच त्यांनी स्वतःच मुधोळवर चाल केली, बाजी घोरपड्यास ठार मारले आणि खवासखान पुढे येताच त्यास खराब करून विजापूरकडे पळवून लावले. या निरनिराळ्या चढायांतूनच मध्ये वेळ काढून जाने. १६६४ मध्ये त्यांनी सुरतेवर छापा घालून अपार द्रव्य रायगडला आणले.

राजे - किताब
 आग्र्याहून सुटून आल्यावर दोन-अडीच वर्षे ते स्वस्थ बसले होते. त्या काळात औरंगजेबाला ते आर्जवाची, माफीची, शरणागतीची पत्रे पाठवीतच होते. औरंगाबादेस त्यांनी संभाजीला मनसबदार म्हणून ठेवले. त्याला पाच हजाराची मनसबदारी होती. त्याच्या दिमतीला प्रतापराव गुजर व आनंदराव यांना ठेवले होते. ही राजनीती इतकी यशस्वी झाली की औरंगजेबाने महाराजांना 'राजे' असा किताब देऊन मराठ्यांच्या स्वतंत्र राज्यास जवळजवळ मान्यताच दिली. तीन एक वर्षे तयारी करण्यात घालविल्यानंतर महाराजांनी पुन्हा चढाई आक्रमण सुरू केले. या वेळी आक्रमणे सिद्धीस जातील अशी परिस्थितीच निर्माण झाली होती.
 अफगाणयुद्धात औरंगजेब गुंतला होता. त्यातच १६६९ साली त्याने रजपुतांशी युद्ध सुरू केले आणि समस्त राज्यातील हिंदूंची मंदिरे पाडण्याचा एकसहा हुकूम जारी केला. याच सुमारास शहाजादा मुअज्जम हा दक्षिणचा सुभेदार आणि त्याचा सरदार दिलेरखान यांच्यात सडकून वाकडे आले. इतके की खानाला पकडण्यासाठी शहाजादा व जसवंतसिंह चालूनही गेले. स्वातंत्र्याची आकांक्षा धरणाऱ्या वीरपुरुपाला यापेक्षा मोठी संधी ती काय असणार ? महाराजांनी पूर्वी जशी आदिलशाहीवर चढाई केली होती तशीच आता मोगली मुलखावर चढाई सुरू केली. प्रथम सिंहगड, मग सुरत, मग बागलाण- साल्हेर, मुल्हेर- बऱ्हाड, पन्हाळा, आणि राज्याभिषेकानंतर फाेंडा किल्ला, सांधे, बिदनूर आणि मग कर्नाटक ! या आक्रमक लढायांतूनच मराठ्यांचे राष्ट्र तयार झाले, असे सरदेसाई यांनी म्हटल्याचे मागे सांगितलेच आहे.

चौथाई
 शत्रूच्या प्रदेशातील व्यापारी पेठांवर, धनाढ्य शहरांवर स्वारी करून, धाड घालून, त्यांच्याकडून चौथाई वसूल करणे हा शिवछत्रपतींच्या युद्धपद्धतीतला आणखी एक महत्त्वाचा विशेष होता. यालाच इंग्रज, पोर्तुगीज, मुस्लिम इतिहासकारांनी लूट म्हटले आहे, आणि याचसाठी छत्रपतींना ते लुटारू म्हणत असत. पण महाराजांच्या स्वराज्यस्थापनेच्या योजनेतली ही पहिली पायरी होती. शत्रूंनी आक्रमिलेल्या प्रदेशातून चौथाई वसूल करणे याचा अर्थ, शत्रूची सत्ता तेथून नष्ट करण्यास आरंभ करणे, असा होतो. आणि तेच महाराजांना करावयाचे होते. शिवाय स्वराज्यस्थापनेच्या