पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४४१
शिवछत्रपतींची युद्धविद्या
 

महाराष्ट्रात स्वराज्याचा बंदोबस्त पुरता लागलेला नसताना जिंजीवेलोर इकडे स्वारी करण्याचे काय कारण होते ? महाराजांच्या आयुष्यातील एकही मुकाबला असा नाही की जेव्हा मृत्यू त्यांना चाटून गेलेला नाही. आणि हे महाराजांच्याच जीवनातले आहे असे नाही. नेपोलियन, वॉशिंग्टन, चर्चिल, लेनिन, सन्यत सेन, कोणताही थोर क्रांतिकारक किंवा राज्यकर्ता घ्या. वेड्या साहसावाचून त्याला मिळाले ते यश कधीच मिळाले नसते.

राजनीतीची जोड
 जुन्नरवर छत्रपतींनी छापा घातला, तेव्हा औरंगजेब विजापूरची आदिलशाही खलास- करण्याच्या उद्योगात गुंतला होता. बिदर, कल्याणी, परिंडा हे किल्ले त्याने घेतले होते आणि हा संग्राम बरेच दिवस चालणार होता. ही संधी छत्रपतींनी साधली. इतक्यात शहाजहानचा हुकूम आला आणि विजापूर- मोगलयुद्ध थांबले. त्यामुळे त्यांच्यावर बाका प्रसंग आला होता. दोन शत्रू- दोन बलाढ्य शत्रू- एकदम दुखवले गेले होते. तेव्हा रणनीतीला राजनीतीची जोड देऊन, त्यांनी औरंगजेबाकडे वकील धाडून, माफीची याचना केली. बादशहांच्या सेवेत येण्यास आपण तयार आहोत, असे कळविले आणि माघार घेतली. तरीही या वेळी एवढ्याने भागले नसते. शिवाजीचा नायनाट करून टाका, अशी आपल्या अधिकाऱ्यांना औरंगजेबाने पत्रे लिहिली होती. इतक्यात शहाजहान आजारी पडला आणि गादी बळकावण्यासाठी त्याला तिकडे जावे लागले आणि महाराजांना श्वास टाकायला वेळ मिळाला. मोगल- विजापूर युद्ध थांबले. त्यामुळे फासा प्रतिकूल पडला. पण शहाजहान आजारी पडल्यामुळे तो सुलटा झाला आणि औरंगजेब पंचवीस वर्ष दक्षिणेत येऊ शकला नाही. तोपर्यंत महाराजांनी त्यालाही दुर्जय अशी शक्ती महाराष्ट्रात निर्माण करून ठेवली होती.

चौफेर चढाई
 अफजलखानाला मारल्यावर आदिलशाहीवर महाराजांनी सर्व दिशांनी आक्रमण सुरू केले, हे मागे सांगितलेच होते. याच वेळी शास्ताखान दक्षिणेत आला व पुण्याला तळ ठोकून बसला. तरी महाराजांनी आक्रमणाचे धोरण सोडले नाही. मोगलांच्या तोंडावर नेताजीस ठेवून ते स्वतः दक्षिण कोकणात उतरले. तेथे पालवणचा राजा यशवंतराव, शृंगारपूरचा राजा सुर्वे यांना नामोहरम करून त्या प्रांतावर त्यांनी आपली सत्ता वसविली. मग राजापूरच्या इंग्रजांकडे ते वळले. पन्हाळ्याच्या वेढ्याच्या वेळी त्यांनी सिद्दी जोहाराला दारूगोळ्याची मदत केली होती. याची त्यांना चांगली अद्दल घडवून महाराज परत आले. १६६३ च्या एप्रिलात शास्ताखानावर छापा घातल्यावर सर्व मुस्लिम विश्वाला क्षणभर घेरी आल्यासारखे झाले. ती संधी साधून छत्रपतींनी चहूकडे चढाई सुरू केली. कोकणात उतरून त्यांनी कुडाळ प्रांत परत