पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
४४०
 

मोगलांचा पार धुव्वा झाला. त्यांचे तीस सरदार व दहा हजार लोक कामास आले. आणि मराठ्यांना सहा हजार घोडे, हजारो उंट, सवाशे हत्ती, मालमत्ता, जवाहीर, कापड अशी अगणित लूट मिळाली. या वेळी मोगलांचे चार मातब्बर सरदार चालून आले असून मोरोपंत पिंगळ्याने उत्कृष्ट व्यूह रचून त्यांना नामोहरम केले. यामुळे या संग्रामाचे मह्त्त्व फार मानले जाते. मराठे ही एक नवी मोठी शक्ती दक्षिणेत उदयास आली, हे या लढाईमुळे औरंगजेबाला आणि इंग्रज, फ्रेंच, पोर्तुगीज या पाश्चात्यांनाही कळून आले. आणि हेही कळून आले की मैदानी लढायांतही मराठे भारी सामान असलेल्या शत्रूला पराभूत करू शकतात.

आक्रमण (पर-आक्रम)
 शिवछत्रपतींच्या रणनीतीचा आपण विचार करीत आहो. त्यांच्या वृकयुद्धपद्धतीचा वर विचार केला. अलीकडे, 'आक्रमण हेच संरक्षण', या तत्त्वाची बरीच चर्चा सर्वत्र चालते. महाराजांच्या रणनीतीत या तत्त्वाचा निश्चित समावेश केलेला होता. एका लहानशा जहागिरीपासून हिंदवी स्वराज्यापर्यंत त्यांना पल्ला गाठावयाचा होता. अबे कॅरेने म्हटल्याप्रमाणे, सिंधू ते गंगा या विस्तीर्ण भूभागात छत्रपतींना स्वराज्य स्थापावयाचे होते. तेव्हा सतत, अखंड, आक्रमण या धोरणाचा अवलंब करण्यावाचून त्यांना गत्यंतरच नव्हते. शिवाय, या धोरणामुळे उपक्रम आपल्या हाती राहून, युद्धाची भूमी व युद्धाची वेळ आपल्याला ठरविता येते, हे नेहमीचे फायदे आहेतच. अर्थात यासाठी कमालीचे साहस, समयज्ञता, कुशल नेतृत्व इ. दुर्मिळ गुण यांची गरज असते. पण ते गुण घेऊनच महाराज जन्माला आले होते. चौदाव्या पंधराव्या वर्षी आपली मुद्रा विश्ववंदिता करण्याची आकांक्षा आणि हिंदवी स्वराज्याची घोषणा या गोष्टी साहसी वृत्तीवाचून शक्यच झाल्या नसत्या.

साहसे श्रीः ।
 १३५७ च्या एप्रिलात छत्रपतींनी जुन्नर, अहंमदनगर या मोगली मुलखावर हल्ला केला. हे साहस म्हणजे इतिहासपंडितांच्या मते अगदी वेडेपणाच होता. कोकणातील कल्याण, भिवंडी या विजापुरी मुलखावर महाराजांचे छापे घालण्याचे काम चालूच होते. अशा वेळी आदिलशाहीपेक्षा शतपट बलिष्ठ अशा मोगलांशी त्यांनी वैर ओढवून घेतले, आणि तसे काही कारण नसताना, हा वेडेपणा नाही तर काय ? डॉ. देवपुजारी यांनी 'शिवाजी अँड दि मराठा आर्ट ऑफ वॉर' या आपल्या ग्रंथात, तसे स्पष्ट शब्दांत म्हटलेही आहे. (पृ. ६३, ७०). पण आपण हे ध्यानात ठेवले पाहिजे की अशा वेड्या साहसावाचून छत्रपतींना काहीच साध्य झाले नसते. चारशे स्वारांनिशी लाख दीडलाख लष्कर असलेल्या शास्ताखानाच्या तळावर छापा घालणे हा कोणत्या दृष्टीने शहाणपणा होता ? सुरतेची स्वारी ही कोणत्या सावधगिरीच्या हिशेबात बसते ?