पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४३९
शिवछत्रपतींची युद्धविद्या
 

कोकणात उतरत असताना मराठ्यांनी त्यांची अशीच लांडगेतोड केली. प्रथम हेराकरवी त्याची सर्व माहिती छत्रपतींनी आणवली, मग त्याच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना झाडीत लष्कर लपवून ठेवले आणि तो अडचणीच्या जागी येताच त्याच्यावर एकदम हल्ला केला आणि त्याचे सर्व सामान, घोडे, तोफखाना लुटून घेऊन त्याची शरणागती पतकरून त्याला हाकलून दिले. पन्हाळ्याला सिद्दी जोहार याने वेढा घातला होता. महाराजांनी किल्ला खाली करतो व स्वतः स्वाधीन होतो, असे त्याला प्रत्यक्ष भेटून सांगितले. त्यामुळे बेटा गाफील झाला आणि महाराज निसटून गेले. शास्ताखानावरील हल्ला हा वृकयुद्धाचाच प्रकार. छावणीत शिरण्यास सशस्त्र मराठ्यांना बंदी होती. तेव्हा दोन ब्राह्मण पाठवून छत्रपतींनी सर्व बातमी काढली; आणि मग, आम्ही पहारेकरी पहारा बदलीत आहोत, अशी थाप देऊन चारशे (केवळ चारशे) लोकांनिशी ते आत शिरले व खानावर त्यांनी हल्ला केला. 'महत्समुदायाशी किंचित् समुदाय सैन्यानी लढून यश संपादावे, हाही प्रकार असाच.' असे शिवदिग्विजयकारांनी म्हटले आहे, ते या शास्ताखानाच्या प्रसंगावरूनच म्हटले असेल. उंबराणीच्या लढाईत प्रतापराव गुजर याने बदलोकखानाचा असाच पाडाव केला.
 मैदानी लढाया, समोरासमोरचे युद्ध छत्रपतींनी केलेच नाही असे नाही. पण तशी उदाहरणे फार थोडी. बव्हंशी ते कूटयुद्धाचाच अवलंब करीत. त्याची कारणे वर दिलीच आहेत. मात्र मैदानी लढाईस त्यांची तयारी मात्र केव्हाही असे. उत्तर- काळात, सभासद, मल्हारराव रामराव यांच्या मते, छत्रपतींचे लष्कर लाखापर्यंत गेले होते. त्याचा सरंजामही खूप वाढला होता. लष्करी शिक्षणाची व्यवस्थाही महाराजांनी केली होती. त्यामुळे मैदानी लढाईचा प्रसंग आला, तेव्हा त्यांनी बेधडक तशी लढाईही केली.

साल्हेर
 मैदानी लढायांत साल्हेरचा संग्राम फार प्रसिद्ध आहे. १६७० च्या ऑक्टोबरात मोरोपंत पिंगळे पेशवा हा बागलाणात शिरला आणि त्याने त्रिंबक, रावळा जवळा हे किल्ले घेतले. प्रतापराव गुजर याने वऱ्हाडात शिरूर, बहादरपुरा व कारंजा इ. शहरे लुटून बऱ्हाड प्रांत साफ नागविला. या आधी सुरतेची लूट झालीच होती आणि ती घेऊन महाराज रायगडास जात असताना दाऊदखान खुरेशी याने त्यांना वणी-दिंडोरीपाशी गाठले. तेव्हा तेथे मोठी लढाई होऊन औरंगजेबाचा हा नामांकित सरदार सपशेल पराभव पावला. यामुळे धास्ती घेऊन बादशहाने महाबतखान, दिलीरखान आणि बहादुरखान असे तीन मोठे सरदार दक्षिणेत पाठविले. १६७१ च्या जानेवारीत मराठ्यांनी साल्हेरचा किल्ला घेतला होता. तो उठविण्यासाठी जूनमध्ये महाबतखान व दिलीखान यांनी त्याला वेढा घातला. त्यावर मोरोपंत पिंगळे व प्रतापराव गुजर चालून आले, तेव्हा १६७२ च्या फेब्रुवारीत घनघोर संग्राम होऊन