पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
४३८
 


वृकयुद्ध
 शिवदिग्विजयकारांनी महाराजांच्या युद्धपद्धतीस वृकयुद्ध असे म्हटले आहे. मराठ्यांचा सुप्रसिद्ध गनिमी कावा तो हाच. त्याला कूटयुद्ध किंवा वृकयुद्ध असे भारतातील प्राचीन नीतिशास्त्रज्ञ म्हणत असत. शुक्रनीती या ग्रंथात कूटयुद्धाचे सविस्तर वर्णन केलेले आहे. शुक्रमुनी म्हणतात, 'शत्रूचा नाश करण्यास युक्त असे कूटयुद्धासारखे दुसरे युद्ध- म्हणजे युद्धपद्धती- नाही. विजयेच्छू राजाने शत्रूशी गोड बोलावे, आपल्या अपराधाची कबुली द्यावी, सेवा, स्तुती इ. उपायांनी त्याचा विश्वास संपादावा आणि मग त्याचा संहार करावा. प्रबळ राजाने शत्रूस पाणी, दाणागोटा, घास कडबा मिळण्याचे बंद करून त्याला अडचणीचे प्रदेशात घालावा आणि मग त्याचा नाश करावा. शत्रुपक्षातील लोकांना देणग्या द्याव्या, सोनेरुपे द्यावे आणि ते गाफील होऊन निद्रावश झाल्यावर त्यांच्यावर छापा घालावा. नेहमी युद्ध एकाकी अकस्मात मुरू करावे. शत्रूवर एकदम हल्ला करावा आणि क्षणार्धात नाहीसे व्हावे.' (शुक्रनीती अ. ४) शिवदिग्विजयकारांनी वृकयुद्धाचे किंवा गनिमी काव्याचे असेच वर्णन केले आहे, 'वृकयुद्ध म्हणजे पाचचार फौजेच्या टोळ्या कराव्या, शत्रुस समजो न देता, संकेतांनी चालावे, एकाने तोंड लावावे. तो परसैन्य अल्पसैन्यावर घे घे मार करीत उठते, मग त्या लोकांनी पळ काढावा, म्हणजे सैन्य मोडले म्हणून पाठी लागणारांस इतर टोळ्यांनी चहूकडून घेरावे. अल्पसैन्य मोठे सैन्यास मारते होऊन, मोठे सैन्यास किती फौज आहे तिची गणती न सापडता, हतवीर्य होते. तेणे करून फत्तेह वृकयुद्धी जाणावी.'
 शिवछत्रपतींच्या रणनीतीचे हे उत्कृष्ट वर्णन आहे. त्यांना या रणनीतीचा आश्रय करण्याखेरीज गत्यंतरच नव्हते. आदिलशाही किंवा मोगल यांचे सेनाबल इतके अफाट होते की त्यांच्या समोरासमोर युद्ध करणे, प्रारंमीच नव्हे तर, पुढेही मराठ्यांना अशक्य होते. साल्हेर किंवा वणीदिंडोरी ही युद्धे त्यांनी मैदानात समोरासमोर केली आणि मोठे विजयही मिळविले हे खरे, पण ते अपवाद होत. बाकी सर्वत्र शिवछत्रपती गनिमी काव्यानेच लढले. कारण मोगलांइतके माणूसबल त्यांच्याजवळ नव्हते आणि तितके सैन्य उभारण्यास पुरेल इतका पैसाही त्यांच्याजवळ नव्हता. शिवाय सह्याद्रीची दऱ्याखोरी त्यांच्या पाठीशी उभी होती. वृकयुद्धाला अत्यंत अनुकूल असा हा भू- प्रदेश असल्याने महाराजांनी त्याच पद्धतीचा आश्रय करण्याचे ठरवून अनेक शत्रूंना तेथेच गारद केले.
 नम्र बोलून, भ्यालोसे दाखवून अफजलखानाचा विश्वास त्यांनी संपादन केला आणि हव्या त्या ठिकाणी आणून, त्याचा वध केला. आणि मग सह्याद्रीच्या दऱ्यांत लपून बसलेल्या मराठा सैन्याच्या अनेक टोळ्यांनी खानाच्या सैन्यावर अचानक हल्ला करून, त्याची लांडगेतोड केली. शास्ताखानाचा सरदार उंबर खिंडीतून