पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४३७
शिवछत्रपतींची युद्धविद्या
 

लागत. छापा घालण्यापेक्षा त्यांना जेवणाची काळजी जास्त असे. नाचरंग, विलास हा त्यांचा नित्यक्रम होता. यामुळे मराठे एका दिवसात जी दौड करीत तितकी करण्यास मोगल लष्करास तीन दिवस लागत. (फॉरिन बायॉग्रफीज् ऑफ शिवाजी, या ग्रंथात ही वर्णने आलेली आहेत.) यामुळे मराठ्यांच्या व मोगलांच्या कार्यक्षमतेत जमीन-अस्मानाचा फरक पडे.
 मराठ्यांचे सामर्थ्य कशात होते ते यावरून कळेल. प्रत्यक्ष युद्धातले डावपेच, रणनीती, त्यांचा गनिमी कावा यांचा विचार आपल्याला करावयाचा आहेच, पण त्यांना जे यश मिळाले त्याचे बव्हंशी श्रेय त्यांचा ध्येयवाद, त्यांची करडी शिस्त आणि त्यांची कडक राहणी यांना आहे, हे आपण ध्यानात ठेवले पाहिजे.

एकहुकमी सेना
 शिवछत्रपतींनी शेवटपर्यंत लष्करात उत्तम शिस्त राखता आली याचे महत्त्वाचे कारण हे की त्यांची सेना ही, डॉ. सेन यांच्या म्हणण्याप्रमाणे, राष्ट्रीय सेना होती. ती वतनदारांची किंवा सरंजामदारांची सेना नव्हती. पेशवाईत तिला तसे रूप आले. शिंदे, होळकर, पवार, पटवर्धन अशा भिन्न सरदारांच्या सेना मिळून मराठ्यांचे लष्कर होई. अगदी प्रारंभीच्या काळी काही दिवस महाराजांनीही देशमुख, वतनदार यांच्या सेना जमा करून काम चालविले. पण लवकरच त्यांनी सेनेचे रूप पालटून ती सर्व एका हुकमतीखाली चालणारी राजसेना करून टाकली. त्यामुळे भिन्न हुकमतीमुळे जो घोळ पडावयाचा तो त्यांच्या लष्करात कधीही पडला नाही. प्रारंभी शिलेदारांचे प्रमाण लष्करात बरेच मोठे होते. मराठा लष्करात दोन प्रकारचे घोडेस्वार असत. बारगीर आणि शिलेदार. शिलेदाराजवळ स्वतःच्या मालकीचा घोडा, हत्यारे व सामान असे. बारगिराचा घोडा व सामान सरकारी असे. या फरकामुळे शिलेदार थोडा स्वतंत्र वृत्तीचा सहजच होई. आणि हेच छत्रपतींना नको होते. त्यामुळे थोड्या प्रमाणात तरी एकमुखी हुकमतीला बाध येई. म्हणून शिलेदारांचे प्रमाण त्यांनी कमी करण्याचे धोरण ठेवले. प्रारंभी सरनोबत माणकोजी दहातोडे यांच्या सेनेत तीन हजारांपैकी दोन हजार शिलेदार होते. पण १६५९ सालापर्यंत दहा हजारांत तीन हजार येथवर ते प्रमाण खाली आणण्यात आले. सरकारी घोडदळाला पागा म्हणत. सभासद लिहितो की राजांनी पागेचे प्रमाण हळूहळू वाढविले आणि शिलेदारांना पागेच्या हुकमतीत कायम ठेवले. त्यामुळे लष्कर एकहुकमी झाले आणि करडी शिस्त संभाळणे अगदी सोपे झाले. मोगली किंवा विजापुरी सैन्यात अशी शिस्त कधीच नसल्यामुळे महाराजांना भराभर विजय मिळत गेला.
 युद्धविद्येतल्या मानवी गुणांचा, मनोबलाचा, अंतःसामर्थ्याचा असा विचार झाल्यावर आता मराठ्यांच्या प्रत्यक्ष रणनीतीचा, प्रत्यक्ष युद्धपद्धतीचा विचार करावयाचा.