पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
४३६
 

गिरीवर असे. सभासद लिहितो, 'दसरा होताच छावणीहून लष्कर कूच करून जावे. आठ महिने बाहेर लष्करांनी परमुलखात पोट भरावे. खंडण्या घ्याव्या. लष्करात बायको, बटकी, कलावंतीण नसावी. जो बाळगील त्याची गर्दन मारावी. परमुलखात पोर, बायको न धरावी. मर्दाना सापडला तरी धरावा. गाई न धरावी. बैल ओझ्यास मात्र धरावा. ब्राह्मणांस उपद्रव न द्यावा. खंडणी केल्या जागा बोलीप्रमाणे पैका घ्यावा. कोणी बदअंमल न करावा. आठ महिने परमुलखात स्वारी करावी. वैशाख मासी परतोन छावणीस येताच आपले मुलखाचे सरदेस (सरहद्दीवर) कुल लष्कराचा झाडा घ्यावा. पूर्वील बिशादीचे (लुटीतील सामानाचे) जायते रुजू घालावे. कोणी वस्तू चोरून ठेवील आणि दाखल सरदारांस जाहलियाने शासन करावे अशी लष्कराची रीत.' (सभासद बखर, कलम २९)
 लष्करातील लुटीसंबंधीचा हा नियम दासी-बटकीसंबंधीच्या नियमाप्रमाणेच कटोर आणि विपरीत (!) होता. स्त्री आणि धन यासाठीच माणसे लष्करात जातात. आणि ही नेमकी विलोभनेच छत्रपतींनी नष्ट करून टाकली. मग मराठा माणूस त्यांच्या लष्करात का आला? मराठा मनाची सांस्कृतिक उंची महाराजांनी वाढविली होती. क्षुद्र वासनांच्या पलीकडे त्यांना दृष्टी फेकण्यास शिकविले म्हणून!

कडक राहणी
 काटक, कडक जीवन, ऐषआरामशून्य राहणी, अत्यंत मर्यादित गरजा हे छत्रपतींच्या युद्धविद्येचे तिसरे लक्षण होते. मराठा शिपायाजवळ बोजा, लवाजमा असा मुळी नसेच. त्यामुळेच लष्कराच्या हालचाली अत्यंत चपलतेने होत असत. भाला, धनुष्यवाण, तलवार आणि फार तर बंदुक ही त्याची हत्यारे. अवजड तोफखाना मराठा लष्कर प्रारंभी कधी ठेवीत नसे. कारण मावळी डोंगरी मुलखात त्याचा तसा उपयोगही नसे. या हत्यारांशिवाय मराठा शिपायांचे सामान म्हणजे थोडीशी भाकरी, घोड्याच्या तोबऱ्याचे हरभरे आणि एखादे घोंगडे ! जमिनीवरच ते घोंगडे खालीवर घेऊन ते निजत. घोड्याचा लगाम मनगटालाच बांधून ठेवीत. स्वारी मोठी असली तरी महाराजांसाठी व मंत्र्यांसाठी एक दोन तंबू असत. बाकी सर्व लष्कर उघड्यावरच राहात, झोपत असे. त्यामुळे विद्युत् वेगाने वाटेल तशा हालचाली करून शत्रूला गाठणे, झोडपणे आणि क्षणार्धात नाहीसे होणे हे मराठ्यांना सहज शक्य होत असे.

मोगल मिजास
 या उलट मोगल लष्कराची ऐषआरामी मिजास पाहा. प्रत्येक मोगल शिपायावरोवर एक उंटभर सामान असे. म्हणजे एका मोगल शिपायाच्या सामानातून मराठ्यांच्या एका तुकडीचा निर्वाह व्हावयाचा. मोगल छावणी म्हणजे एक वैभवनगरच असे. सरदारांचा जनानखाना नेहमी बरोबरच असावयाचा. त्यांना हत्यारे नेण्यास माणसे