पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४३५
शिवछत्रपतींची युद्धविद्या
 

मारता मरावे, मारूनी आपण उरावे,' यासाठी सिद्ध केले. महाराजांना या क्षात्रधर्माची स्फूर्ती रामायण-महाभारतापासून झाली. म्हणूनच या ग्रंथांचे पठण गडागडावर, आणि लष्करातही व्हावे, अशी योजना त्यांनी केली होती. गो. स. सरदेसाई म्हणतात, महाराष्ट्रात जी राज्यस्थापना झाली तिचे बीज ऐतिहासिक कवींनी पेरले, असे म्हणण्यास चिंता नाही. असे कळते की शिवाजीच्या प्रत्येक किल्ल्यावर मुद्गल कवीचे रामायण असे. या कवीने मुसलमान व मराठे यांची कित्येक चित्रे काढिली आहेत. प्रत्येक किल्ल्यावर रात्री भोजन झाल्यावर हे रामायण वाचीत. तसेच फौजेतही मुद्दाम वाचवीत.' (नेताजी सुभाषचंद्र हे आझाद हिंद सेनेत सावरकरांचे 'सत्तावनचे स्वातंत्र्यसमर' असेच वाचीत असत.) हा मुद्गल कवी म्हणजे सतराव्या शतकाच्या प्रारंभी होऊन गेलेला कृष्णदास मुद्गल होय. त्याने फक्त युद्धकांडच रचले आहे. त्याच्या या युद्धकांडाची पारायणे मराठेशाहीत किल्ल्यांकिल्ल्यांवरून नेहमी होत. (असे वि. ल. भावे व ल. रा. पांगारकर यांनी म्हटले आहे.) यामुळेच मराठ्यांचा क्षात्रधर्म जागृत झाला.

कठोर शिस्त
 अत्यंत कडक, कठोर, चोख शिस्त हे महाराजांच्या युद्धविद्येचे दुसरे लक्षण होय. त्या शिस्तीचे स्वरूप आपण पाहिले तर, वरील प्रकारच्या ध्येयवादावाचून असल्या शिस्तीचे पालन करून घेणे सर्वथा अशक्य आहे, हे आपल्या ध्यानात येईल. लष्कराचा तळ पडेल त्याच्या भोवतालचा परिसर उजाड, उद्ध्वस्त होणे हा मागल्या काळी नियमच होता. मुस्लिम लष्करातील शिपाई उभी पिके कापून नेत. घराच्या छपरातील गवत उपसून नेत, धनधान्याची लूट करीत, गावकऱ्यांना वेठीला धरीत आणि स्त्रियांची वाटेल ती विटंबना करीत. त्यांच्या लष्करी छावणीत दासी, बटकी, नर्तकी वारांगना शेकड्यांनी असत, नाचरंग, भोग, धुंदी हेच त्या लष्कराचे नित्याचे जीवन होते. मराठा सरदारांनी सुलतानासाठी लष्करे उभारली त्यांचीही हीच रीत होती. असा भोवतालचा रीतिरिवाज, आणि नित्यक्रम असताना लष्करात, स्त्री केव्हाही दिसता कामा नये, कोणीही बरोबर स्त्री आणता कामा नये, असा दण्डक घालून तो कसून अमलात आणणे हा विचार कोणालाही वेडेपणाचा, विपरीत आणि दुर्घट असाच वाटला असता. पण मोगलांच्या बलाढ्य सत्तेला नामोहरम करून स्वराज्याची स्थापना करण्याचे अती दुर्घट कार्य शिरी घेतल्यानंतर अशा अनंत दुर्घट गोष्टी महाराजांना कराव्या लागल्या आणि त्या त्यांनी करून दाखविल्या. त्यांनी निर्माण केलेली धर्मनिष्ठा, राष्ट्रनिष्ठा, स्वराज्यप्रेम यांमुळेच ते शक्य झाले.

लष्कराची रीत
 महाराजांचे लष्कर पावसाळा सोडून राहिलेले आठ महिने स्वराज्याबाहेर मुलख-