पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
४३४
 

शत्रूचा नाश होतो त्या उपायालाच शस्त्र (म्हणजे शस्त्रविद्या व युद्धविद्या) असे म्हणतात. नुसते हातपाय तोडणे किंवा माना कापणे याला शस्त्र म्हणत नाहीत. 'न शस्त्रं छेदनं स्मृतम्।' (२,५५,९) मराठा सरदार शत्रूचा नाश करण्याचे उद्दिष्टही मनापुढे ठेवीत नव्हते. उलट ते त्याच्या राज्याचा विकास घडवीत होते. तेव्हा त्यांचा पराक्रम म्हणजे युद्धविद्या नव्हे. आणि त्यांचा धर्म हा क्षात्रधर्मही नव्हे. तो लुप्त झालेला क्षात्रधर्म महाराजांनी जागृत केला आणि युद्धविद्येची जोपासना करून हिंदुधर्म, हिंदुसंस्कृती, हिंदुपरंपरा यांचे रक्षण केले.

मोठी प्रेरणा
 अशी ही जी युद्धविद्या तिचे पहिले लक्षण म्हणजे ध्येयवाद हे होय. थोर, उदात्त अशा ध्येयवादावाचून लष्कराच्या हातून अद्भुत असे पराक्रम होत नाहीत. युद्ध हा मरणमारणाचा संग्राम आहे. दरघडीला त्यात मृत्यू समोर उभा असतो. तो मृत्यू पत्करूनही मिळविण्याजोगे काही आहे, असे वाटल्यावाचून, तशी निष्ठा, तशी श्रद्धा असल्यावाचून, माणसे अंतिम त्यागाला सिद्ध होत नाहीत. धर्मनिष्ठा, स्वामिनिष्ठा, राष्ट्रप्रेम, स्वातंत्र्यप्रेम अशी कोणती तरी प्रेरणा मागे असल्यावाचून बलाढ्य शत्रूवर विजय मिळविणे शक्य होत नाही. वॉशिंग्टनच्या लढाया, गॅरीबाल्डीच्या लढाया, माओत्से तुंगच्या लढाया, जपान-चीन, जपान - रशिया या लढाया, परवाच्या व्हिएटनाममधील लढाया यांचा इतिहास हेच सांगतो. डॉ. सुरेन्द्रनाथ सेन यांनी असा सिद्धांतच सांगितला आहे. ते म्हणतात, 'लष्कर कार्यक्षम व्हावे यासाठी, प्रथम त्यात शिस्त असली पाहिजे; पण त्यापेक्षाही त्या लष्करापुढे काही ध्येय असले पाहिजे, ज्यासाठी लढावे असे उदात्त उद्दिष्ट असले पाहिजे. असे ध्येय मराठा वतनदार, सरदार यांच्यापुढे नव्हते. ते स्वार्थी, वतनासक्त होते. अशा वेळी लोकांच्यापुढे शिवाजी महाराजांनी 'हिंदवी स्वराज्य' हे ध्येय ठेवले. त्यामुळेच मराठी जनतेच्या अंगी नवे तेज आले आणि स्वराज्याच्या कार्याला ती सिद्ध झाली.' (मिलिटरी सिस्टिम ऑफ दि मराठाज्, प्रकरण १ ले, शिवाजी व त्याचे अनुयायी )
 'हिंदवी स्वराज्य' हे छत्रपतींचे ध्येय होते आणि मुख्यतः त्यांना धर्मराज्य स्थापावयाचे होते असे डॉ. सेन यांनी म्हटले आहे. गो. स. सरदेसाई, डॉ. बाळकृष्ण या इतिहासपंडितांचे हेच मत आहे; आणि आता हे सर्वमान्य झाले आहे.

मुद्गल रामायण
 शिवछत्रपती म्हणजे मूर्तिमंत ध्येयवाद होते ही गोष्ट सूर्यप्रकाशाइतकी स्पष्ट आहे. हिंदुधर्माचे रक्षण, हिंदुसंस्कृतीचे पुनरुज्जीवन हे त्यांचे ध्येय तेराव्या चौदाव्या वर्षीच निश्चित झाले होते, याविषयी आजच्या सर्व इतिहासपंडितांचे एकमत आहे. हाच जाज्ज्वल्य ध्येयवाद मराठी सामान्य जनांच्या चित्तात रुजवून त्यांनी त्यांना, 'मारता