पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



२२.
शिवछत्रपतींची युद्धविद्या
 



महत्त्व
 समाजाच्या संस्कृतीच्या अभ्यासात त्या समाजाची धर्मनिष्ठा, त्याची अर्थव्यवस्था, त्याचे स्वातंत्र्यप्रेम या घटकांचा जसा समावेश होतो तसाच युद्धविद्येचाही होतो, झाला पाहिजे. कारण ही विद्या नसेल तर संस्कृतीचे इतर सर्व घटक फोल ठरतात. 'शस्त्रेण रक्षिते राज्ये शास्त्रचिंता प्रवर्तते ।' हे व्यासवचन मागे दिले आहे. त्याचा अर्थ हाच आहे. शस्त्रबलाने राज्याचे, समाजाचे रक्षण होत असेल तरच त्या समाजात शास्त्रे, विद्या, धर्म यांचा विजय होतो आणि तसे रक्षण झाले नाही तर विकसित झालेली शास्त्र, प्रौढ झालेला धर्म यांचाही लय होतो. शिवछत्रपतींच्या आधीच्या तीनशे वर्षांच्या कालात महाराष्ट्रात हेच घडत होते. मराठ्यांना शस्त्राने आपल्या राज्याचे- स्वराज्याचे- रक्षण करता येत नव्हते. आणि त्यामुळे येथला धर्म, येथली लक्ष्मी, येथल्या विद्या, कला, येथली शास्त्रे यांचा लोप होण्याची वेळ आली होती. संतांनी आपल्या वाणीने धर्मरक्षणाची पराकाष्ठा चालविली होती. पण सरदारांनी, मुत्सद्दयांनी युद्धविद्येची साथ तिला दिली नाही. म्हणून संतांच्या प्रयत्नांना यावे तसे यश येत नव्हते. शिवाजी महाराजांनी हे जाणले आणि युद्धविद्येची जोपासना करून महाराष्ट्र संस्कृतीचे रक्षण केले.
 सरदारांनी युद्धविद्येची साथ दिली नाही, असे वर म्हटले आहे. त्या सरदारांच्याजवळ ती विद्या नव्हतीच. ते सरदार युद्धे करीत होते, युद्धात पराक्रम गाजवीत होते; पण याला युद्धविद्या म्हणत नाहीत. महाभारतात म्हटले आहे की 'ज्या उपायाने
 २८