पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१९
महाराष्ट्राची पृथगात्मता
 



राजशेखर
 काव्यमीमांसाकार राजशेखर हा सुप्रसिद्ध कवी दहाव्या शतकात होऊन गेला. तो महाराष्ट्रीय असावा असा पंडितांचा तर्क आहे. त्याला महाराष्ट्राचा मोठा अभिमान होता हे निश्चित. आपला पणजा अकालजलद त्याचा त्याने महाराष्ट्र - चूडामणी असा उल्लेख केला आहे ( बाल रामायण १.३० ). काव्यमीमांसेत राजशेखराने कविराजांची काव्यपरीक्षेची सभा कशी असावी याचे वर्णन केले आहे. त्यावरून त्या वेळी अपभ्रंश भाषेचे स्थान काय होते ते कळून येते. या सभेत उत्तरेला संस्कृत कवी, पूर्वेला प्राकृत कवी आणि पश्चिमेला अपभ्रंश कवी बसावे असे सांगून राजशेखराने या भिन्न भाषिक कवींच्या मागे कोणी बसावे सांगितले आहे. तो म्हणतो, संस्कृत कवींच्या मागे पंडित असावे, प्राकृत कवींच्या मागे नर्तक, नट, गवई असावे आणि अपभ्रंश कवींच्या मागे मात्र वणिग्वरी, सोनार, लोहार, सुतार व त्यांसारखे इतर असावे. यावरून सामान्यजनांची बोली अपभ्रंश ही असून तिच्यात वाङ्मय निर्माण होत असावे असे डॉ. गुणे यांनी अनुमान केले आहे, ते सयुक्तिक वाटते.

पुष्पदन्त - मराठी कवी
 महापुराण, जसहरचरिऊ व णायकुमारचरिऊ या काव्यत्रयीचा कर्ता अपभ्रंश महाकवी पुष्पदन्त याचा वर उल्लेख आलाच आहे. 'राष्ट्रकूटकालीन मराठी' या आपल्या लेखात श्री. ग. वा. तगारे यांनी वरील ग्रंथांच्या भाषेतील वर्णप्रक्रिया, प्रत्ययप्रक्रिया व वाक्यरचना यांची चिकित्सा करून 'ही भाषा म्हणजे ज्ञानेश्वर- पूर्वकालीन मराठीच होय ' व ' पुष्पदन्त मराठीचाच कवी होता', असे मत मांडले आहे. ( महाराष्ट्र साहित्यपत्रिका, वर्ष १४, अंक १ ला . ) हे मत सर्वमान्य झाले नाही. पण श्री. प. ल. वैद्यसंपादित 'महापुराणा'ला नाथूराम प्रेमी यांनी जे प्रास्ताविक जोडले आहे त्यात या मताचा आवर्जून उल्लेख केला आहे. याशिवाय नाथूराम यांनी अशीही माहिती दिली आहे की पुष्पदन्ताचे एक नाव खंड असे होते; आणि महाराष्ट्रात खंडूजी, खंडोबा ही नावे प्रचलित आहेतच ( प्रास्ताविक पृ. ६ ). पुष्पदन्त मूळचा महाराष्ट्रीय नव्हे. पण प्रौढपणी महाराष्ट्रीय झाल्यावर त्याने हे नाव स्वीकारले असावे.
 श्री. तगारे यांनी आपल्या सिद्धान्ताला पुढीलप्रमाणे पुरावे दिले आहेत. ते म्हणतात, पुष्पदन्ताचे लिखाण ज्ञानेश्वरपूर्वकालीन मराठीत आहे याला पुढील प्रमाणे देता येतील - ( १ ) ते वाङ्मय महाराष्ट्राची प्राचीन राजधानी मान्यखेट येथे लिहिले गेले आहे. आज निर्विवाद तऱ्हेने मराठी समजले जाणारे बरेच प्राचीन वाङ्मय मान्यखेटच्या जवळपास निर्माण झाले आहे. (२) ते वाङ्मय बहुजनसमाजाला कळून धर्मप्रसार व्हावा या उद्देशाने मान्यखेटच्या देशभाषेत लिहिले आहे. (३) ज्ञानेश्वर कालीन मराठीत ( व आजसुद्धा ) प्रचलित असलेले अनेक शब्द त्यात आढळतात. ( ४ )