पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
४३२
 

सामावून घेतले. त्यांचा मऱ्हाष्ट्र असा व्यापक होता.
 शिवछत्रपतींनी कोणती राजकीय क्रांती केली हे यावरून स्पष्ट होईल. 'आपण मराठे म्हणजे एक राष्ट्र आहो' ही भावना त्यांनी या लोकांत रुजविली व त्यांना जागृत आणि संघटित करून, पाचशे वर्षे भारताच्या मानेभोवती बसलेला मुस्लिम सत्तेचा फास तोडून टाकण्याइतके दुर्जेय सामर्थ्य या भूमीला प्राप्त करून दिले.
 सिकंदर, हानिबॉल, सीझर यांच्याशी पाश्चात्य लोक त्यांची तुलना करतात. पण ती केवळ एकदेशीय होय. युद्धनेतृत्वात फार तर ते महाराजांच्या तुलनेला येतील. पण आपल्या भूमीला त्यांनी सामर्थ्य प्राप्त करून दिल्याचे इतिहास सांगत नाही. 'तयाचे गुण महत्त्वासी तुलना कैची ?' हेच खरे.