पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
४२८
 

माणूस त्याच्या जागी नेमलेला आहे. तान्हाजीच्या जागी सूर्याजी आला तो त्याच्या गुणांमुळे, भाऊ म्हणून नव्हे, हे डॉ. सेन यांनी आवर्जून सांगितले आहे. (पृ. १८, १९) यावरून महाराजांची दृष्टी पूर्णतया राष्ट्रीय होती, हे दिसून येईल तशी ती असल्यामुळेच सर्व जातींच्या गुणविकासाला संधी मिळून राष्ट्रीय प्रपंचाला अवश्य ते सर्व कर्तृत्व उपलब्ध झाले.

यदुनाथ सरकार
 असे असताना, 'शिवाजीच्या राज्यात कर्मठपणा आणि जातिभेद वाढीस लागले, त्याचे स्वराज्याचे ध्येय कर्मठपणावर आधारले होते' असे यदुनाथ सरकार यांनी म्हणावे याचा विस्मय वाटतो. पण रवींद्रनाथ टागोर तर यापुढे जातात आणि समाजातले हे भेद, या चिरा टिकवून धराव्या असा शिवाजीचा हेतू होता, असे म्हणतात. 'शिवाजीने महाराष्ट्रात राष्ट्र निर्माण केले' असे यदुनाथांनीच म्हटले आहे. इतरही अनेक प्रकारे महाराजांचा गौरव त्यांनी केला आहे. आणि तरीही वरील प्रकारची विधाने ते करतात आणि त्यांच्या पुष्टीसाठी टागोरांचे अवतरण देतात ! हा सर्वच प्रकार अत्यंत उद्वेगजनक आहे. डॉ. सुरेंद्रनाथ सेन यांनी हे मत खोडून काढले आहे, हे वर सांगितलेच आहे.

मुलाहिजा नाही
 आणि महाराजांची स्वतःची पत्रे या बाबतीत अगदी निर्णायक आहेत. १६७१ साली चिपळूण तालुक्यात लष्कराचा तळ पडला होता. तेव्हा जुमलेदार, हवालदार, कारकून यांनी एकंदर व्यवस्था कशी ठेवली पाहिजे, हे सांगण्यासाठी त्यांना महाराजांनी पत्र लिहिले, ते पत्र फार प्रसिद्ध आहे. त्यात सर्व तऱ्हेच्या ताकिदी देऊन झाल्यावर शेवटी बजावले आहे की 'या संबंधात ज्याचा गुन्हा होईल, येणेप्रमाणे वर्तणूक करिता ज्यापासून अंतर पडेल त्यास, मराठियाची तो इज्जत राहणार नाही. जास्ती (शिक्षा) केल्यावेगळ (केल्यावाचून) सोडणार नाही.'
 ब्राह्मणांच्या बाबतीतही छत्रपतींची हीच वृत्ती होती. आपण श्रेष्ठ वर्णाचे, आपण ब्राहाण. त्यामुळे आपल्याला गुन्हे माफ होतील, आपल्याला कोणी काही करू शकणार नाही, असल्या समजुती त्यांना नष्ट करावयाच्या होत्या. प्रभावळीचा एक कारकुन जिवाजी विनायक सुभेदार याने हुकमाप्रमाणे काही ऐवज पोचवावयाचा होता तो पोचविला नाही. त्यामुळे महाराजांनी त्यास लिहिले, 'ऐसे नादान थोडे असतील. हबशियांनी काही देऊन आपले चाकर तुम्हांला केले असतील ! त्याकरित ऐशी बुद्धी झाली असेल. ऐशा चाकरास ठीकेठीक केले पाहिजे.' अशी जरब देऊन शेवटी ते म्हणतात, 'ब्राह्मण म्हणून कोण मुलाहिजा करू पाहातो. गनीमाचे चाकर गनीम जालेस, ऐसे जाणून बरा नतीजा (शिक्षा) तुम्हांस पावेल.'