पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४२७
'मऱ्हाष्ट्र राज्य'
 

णार, अशी योग्यता व उपमा दुसरियास येणे नाही.' पण हे सर्व मोठेपण छत्रपतींच्या प्रेरणेनेच निर्माण झाले होते. ते नसते तर रघुनाथपंत व्यंकोजीचे, व फार तर आदिलशाहीचे, एक मोठे दिवाण म्हणून गाजले असते ! छत्रपतींनी निर्माण केलेल्या ध्येयवादामुळे ते राष्ट्रनिर्मितीच्या कार्यातील एख प्रमुख शिल्पकार म्हणून गाजत राहिले.

नवे चैतन्य
 वर जी नावे दिली आहेत ती त्यातल्या त्यात ज्यांनी विशेष कर्तबगारी केली त्यांची आहेत. पण या प्रत्येकाच्या मागे शेकडो, हजारो सामान्य जन उभे होते. त्या सर्वाच्याच ठायी काही नव्या चैतन्याचा संचार झाला होता. आणि यातच शिवछत्रपतींचे अनन्यसामान्यत्व आहे. हा राजा आपल्या धर्माचा आहे, हा आपल्या रामकृष्णशिवादी दैवतांचे, त्यांच्या देवळांचे रक्षण करील, या विचाराने बहुतजन आनंदले होते हे तर खरेच. शिवाय याच्या राज्यात आपल्या जमिनीचे, भाकरीचे, मुलाबाळांचे, बायकांचे रक्षण होईल असा दिलासा मिळाल्यामुळे ते छत्रपतींच्या पाठीशी उभे राहिले हेही खरे. पण यासाठी लढा करायला, प्राणपणाने झुंजायला, आत्मार्पण करायला ते इतके दिवस सिद्ध नव्हते. ती वृत्ती त्यांच्या ठायी महाराजांनी निर्माण केली होती. राष्ट्रीय वृत्ती ती हीच.

सर्व वर्ण, सर्व जाती
 वरील नामावळींतून आणखी एक गोष्ट दिसून येते. छत्रपतींच्या अनुयायांत सर्व वर्णांचे, सर्व जातींचे, स्पृश्य, अश्पृश्य सर्व सर्व लोक होते. आणि प्रत्येक माणूस अंगावर येईल ते, साधेल ते, कोणत्याही वर्णाचे वा जातीचे, काम करीत होता. लढाईत तर जाति- वर्णनिरपेक्ष प्रत्येक मराठा उभा होता. तसा महाराजांचा दंडकच होता. पण कारभार, महसूल, जमीन मशागत, किल्ल्यांची बांधणी, जहाजांची उभारणी, जमिनीवरील व समुद्रावरील वाहतूक, परकी दरबारातील वकिली, हेरगिरी या सर्व क्षेत्रांत सर्व वर्णाचे व जातीचे लोक नेमलेले असत. आणि या सर्व नेमणुका अंगचे गुण पाहून केलेल्या असत. अनुवंशावर महाराजांचा मुळीच विश्वास नव्हता. बापाची जागा मुलाला मिळायची असा त्यांच्या राज्यात रिवाज नव्हता. मुलगा गुणी असला तरच त्याला ते पद प्राप्त होई. पण मुलगा गुणी निघेलच अशी केव्हाच खात्री नसते. वतनदारीविरुद्ध हाच तर फार मोठा आक्षेप होता. हे अमात्यांनी आज्ञापत्रात सांगितल्याचे मागे निर्देशिले आहेच. 'मिलिटरी सिस्टिम ऑफ दि मराठाज' या आपल्या ग्रंथात डॉ. सुरेंद्रनाथ सेन यांनी आरंभीच हे स्पष्ट केले आहे, आणि तुकोजी, माणकोजी दहातोंडे, नेताजी पालकर, प्रतापराव गुजर आणि हंबीरराव मोहिते या छत्रपतींच्या पाच सरनोबतांचे- सेनापतीचे- उदाहरण दिले आहे. एक सरनोबत गेला किंवा बडतर्फ केला की त्याच्या जागी त्याचा मुलगा किंवा नातेवाईक केव्हाही नेमलेला नाही. दुसरा गुणी