पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
४२६
 

कंक, बाळाजी आवजी, संभाजी कावजी, रघुनाथ बल्लाळ कोरडे, कान्होजी जेधे, दादाजी नरस प्रभू, प्रल्हाद निराजी, आनंद मकाजी, आबाजी सोनदेव, रामचंद्र नीळकंठ अमात्य, त्र्यंबक भास्कर, दौलतखान, मायनाक भंडारी, निराजी रावजी, पंताजी गोपिनाथ, फिरंगोजी नरसाळा, बहिर्जी नाईक, भिमाजी पंडित, जिवा महाला या पुरुषांचे कर्तृत्व पाहून मन थक्क होते.

पारडे फिरले
 मोरोपंत पिंगळे हा उत्तम प्रशासक तर होताच, पण तसाच मोठा सेनापतीही होता. आणि प्रतापगडाची उत्तम बांधणी करावी हे कसबही त्याच्याजवळ होते. तसाच अनाजी दत्तो. जमीन महसुलाची व्यवस्था त्याने बांधून दिली पण पन्हाळा, कोंडाणा काबीज करण्यातही तो अग्रभागी होता. अष्ट प्रधानांना भिन्न भिन्न खाती दिली होती, पण रणविद्या प्रत्येकाला आलीच पाहिजे असा महाराजांचा दंडक होता. आणि एक पंडितराव वगळता बाकीच्यांनी अनेक रणक्षेत्रांत तलवार गाजविलेलीही आहे. हंबीरराव मोहिते तर सेनापतीच होता. त्याने कोप्पळला जो संग्राम केला त्यावरून मुस्लिम आणि मराठे यांच्या सामर्थ्याचे, पराक्रमाचे पारडे कसे समूळ फिरले हे दिसून येते. कोप्पळला हुसेन मियाना हा मोठा कजाख विजापुरी सरदार होता. त्याची जमियत (सेना) मोठी होती. हंबीररावाची फौज थोडी होती. पण जसे वेणीचे केस दुभागून स्त्री वेणी घालते तशा रीतीने हंबीररावाने हत्यार चालविताच फळी फुटोन दुभांग केले. आणि मग मराठ्यांनी लांडगेतोड केली ती इतकी भयंकर होती की विजापुरी मुसलमानी फौज अल्लाची प्रार्थना करू लागली - 'मराठ्यांचे लढाईची गाठ पुहा घालू नको !'
 आतापर्यंत मुसलमानी फौजांनी हिंदूंची दैना करावी असा इतिहासाचा रिवाज होता. आता युग पालटले. दोनशे दोनशे मराठे लाख दीड लाख फौजेच्या तळात मध्यभागी असलेल्या शायस्ते खानावर तुटून पडतात आणि त्याला नामोहरम करून दिल्लीला हाकलून देतात. नेताजी पालकर, प्रतापराव गुजर हे विजेसारखे कोकणातून घाटावर, बाटावरून बागलाणात, तेथून वऱ्हाडात, तेथून अकस्मात विजापुरावर असे चकाकत हिंडत असतात, आणि मुस्लिम सत्तेचा पाया हादरून टाकीत असतात !
 रघुनाथ नारायण हणमंते हा प्रथम शहाजीचा आणि नंतर व्यंकोजीचा कारभारी. व्यंकोजीने तंजावरास राज्य स्थापिले. पण ते विजापूरचे मांडलीक राज्य होते. छत्रपतींचा उदय झालेला ऐकून, रघुनाथपंतांना तसेच स्वराज्य कर्नाटकात व्हावे, अशी उभारी आली. व्यंकोजीला ते मानवेना. तेव्हा नोकरी सोडून हा गृहस्थ गोवळकोंड्यास गेला आणि मादण्णाशी खलबत करून छत्रपतींच्या दक्षिण दिग्विजयाचे सर्व कारस्थान याने रचले आणि कर्नाटक प्रांत स्वराज्यात आणण्यात महाराजांना अनमोल साह्य केले. महाराजांना त्याच्याबद्दल किती आदर होता ? ते लिहितात, 'आपण आम्हां (शहाजी-) महाराजांचे ठायी. आम्ही चुकलो असता शासन करून सन्मार्गास लाव-