पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४२५
'मऱ्हाष्ट्र राज्य'
 

राज्य मोडेल अशातला प्रकार बिलकुल नाही. इतकी त्याची व्यवस्था इकडे परिपूर्ण झाली आहे.'
 हे मऱ्हाष्ट्र राज्य आहे, एका शिवाजीचे किंवा भोसले घराण्याचे हे राज्य नाही, याचा भावार्थ यावरून स्पष्ट होईल.

(३) विशाल ध्येयवाद
 शिवछत्रपतींनी येथे राष्ट्र निर्माण केले याचा अर्थ विशद करताना सरदेसाई, यदुनाथ सरकार व सेतुमाधवराव पगडी यांनी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे. 'महाराष्ट्रीयांच्या अंगच्या गुणांच्या विकासास संधी मिळाली,' 'प्रत्येक जातीच्या माणसास पुढे येण्यास वाव मिळाला,' 'मराठ्यांच्या सुप्त शक्ती जागृत झाल्या,' ही ती गोष्ट होय. ग्राम, वतन, जाती या कूपात अडकून पडलेल्या मंडुकांच्या ठायी अशा शक्ती जागृत होत नाहीत. राष्ट्रनिष्ठा, धर्मनिष्ठा असा विशाल ध्येयवादच थोर कर्तृत्वाला प्रेरणा देऊ शकतो. छत्रपतींच्या प्रेरणेने असा विशाल ध्येयवाद मराठ्यांना लाभला आणि भिन्न भिन्न क्षेत्रांत येथे थोर पुरुष निर्माण होऊन त्यांच्या रूपाने राष्ट्रभावना मूर्त रूपाला आली.

विशाल अहंकार
 बाजी प्रभू, मुरार बाजी, तान्हाजी मालुसरे यांनी केलेला आत्मयज्ञ हा आधीच्या तीनशे वर्षांत केव्हाही दिसला नव्हता. वतनासाठी खून, रक्तपात, आणि सुलतानांच्या सेवेत राहून हिंदुराज्यांचा नाश एवढाच देशमुख, देशपांडे, मनसबदार, सरदार यांचा उद्योग होता. हेच लोक आता वतनापलीकडे पाहू लागले होते. मावळातले एखादे खोरे, खानदेशातला एखादा परगणा यांवरून त्यांची दृष्टी अखिल महाराष्ट्रात, अखिल हिंदुसमाज येथपर्यंत पोचू लागली. अहंकार व्यापक करणे हेच परमार्थात उद्दिष्ट असते. 'अहं' म्हणजे मी एक व्यक्ती ही भावना टाकून 'अहं ब्रह्मास्मि' असा भाव मनात बाणवावा, असे तत्त्ववेत्ते सांगतात. राजकारणात हेच व्हावे लागते. मुरारबाजीला मी म्हणजे एक व्यक्ती, एका कुटुंबाचा प्रमुख, जावळीच्या मोऱ्यांच्या पदरी असलेला मोठा अधिकारी, एवढाच प्रथम अहंभाव होता. छत्रपतींच्या सेवेत आल्यावर त्याचा अहंकार विशाल होऊ लागला. आणि मऱ्हाष्ट्र राज्याशी तो एकात्म झाला. दृष्टी अशी अत्यंत व्यापक झाल्यावाचून, राष्ट्रीय अस्मितेशी वैयक्तिक अस्मितेचे तादात्म्य झाल्यावाचून, आत्मार्पण हा जो परमोच्च त्याग त्याला माणसाचे मन सिद्ध होत नाही. अशा त्यागाला मराठ्यांची मने छत्रपतींनी सिद्ध केली, हीच त्यांनी केलेली राष्ट्रीय किंवा राजकीय क्रांती होय.
 मोरोपंत पिंगळे, अनाजी दत्तो, नेताजी पालकर, प्रतापराव गुजर, हंबीरराव मोहिते, हरजी राजे महाडिक, रघुनाथपंत हणमंते, बाजी पासलकर, रामाजी पांगेरा, येसाजी