पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
४२४
 

सर्व महाराष्ट्र, सर्व हिंदुस्थान हे तुझे जग आहे व या सर्व भूमीचा मालक तू आहेस, या सर्व भूमीची चिंता वहाणारा तू विशाल आत्मा आहेस, हे ज्ञान दिल्यावाचून महत् कार्य करण्याचे सामर्थ्य त्याला येणारच नाही. समर्थांनी अगदी लहानपणीच आईला, 'चिंता करितो विश्वाची' असे उत्तर दिले होते. अशीच विश्वाची चिंता पारमार्थिक व ऐहिक दोन्ही जीवनात करावयास त्यांनी महाराष्ट्रीयांना शिकविले. शिवछत्रपतींनी 'हिंदवी स्वराज्य' हा मंत्र त्यांना सांगून हेच विशाल ध्येय त्यांच्यापुढे उभे केले. प्रारंभापासूनच आपली मुद्रा विश्ववंदिता असली पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता. केवळ आदिलशहा किंवा कुतुबशहा यांना संतुष्ट करण्यातच धन्यता मानणाऱ्या, आणि वतनाचे स्वामित्व हेच अंतिम उद्दिष्ट डोळ्यांपुढे ठेवणाऱ्या मराठ्यांना हे विशाल दर्शन होताच त्यांना नवे स्फुरण आले; त्यांना दिल्ली दिसू लागली; आणि शेजारच्या वतनदारांची बायकामुले मारण्यात खरा पुरुषार्थ नसून दिल्लीवर चालून जाण्यातच तो आहे, हा भाव त्यांच्या मनात उदित झाला; आणि संतांची निवृत्ती, शास्त्रीपंडितांचे कलियुग यांनी क्षीण शक्ती झालेला हा समाज पराक्रमाच्या कोटी करण्यास सिद्ध झाला.

युद्धातून राष्ट्र
 आग्र्याहून सुटून आल्यानंतर दोनतीन वर्षांत सर्व सिद्धता करून छत्रपतींनी पुन्हा १६७० साली रणसंग्राम सुरू केला व एका मागोमाग अभूतपूर्व असे विजय मिळविले. त्यांचे वर्णन करताना रियासतकार सरदेसाई लिहितात, 'याच युद्धात मराठ्यांचे राष्ट्र तयार झाले. या राष्ट्राचा मध्यवर्ती खांब शिवाजी होता. राष्ट्रावर जेव्हा असे चोहोंकडून आघात होऊ लागतात, तेव्हाच त्याचे ऐक्य होऊन त्याची संघशक्ती वाढत जाते. मराठे, ब्राह्मण, प्रभू, वगैरे शेकडो इसम जिवावर उदार होऊन राष्ट्रकार्य करू लागले, आपण सर्व या राष्ट्राचे घटक आहोत, राष्ट्रसेवेकरता सर्वस्व खर्ची घालणे हे आपले कर्तव्य आहे, अशा भावनेने त्या वेळी सर्वांनी उद्योग केला; म्हणूनच चारही दिशांस शिवाजीचे राज्य वृद्धिंगत झाले. विजापूर, गोवळकोंडा येथील सुलतान शिवाजीस खंडण्या देऊ लागले आणि बऱ्याच मोगल प्रदेशांतून त्यास चौथाई मिळू लागली. अशा प्रकारे शिवाजीचे राज्य व मराठ्यांचे राष्ट्र लौकिक दृष्ट्या सिद्ध झाले.' (शककर्ता शिवाजी, पृ. १४९, १५०)

उत्तम गमक
 मराठ्यांचे राष्ट्र सिद्ध झाले याचे एक उत्तम गमक रियासतकारांनीच दिले आहे. छत्रपती आग्र्याला कैदेत असताना त्यांना ठार करावे असा औरंगजेबाचा विचार होता. त्याबद्दल जयसिंगाने त्याला लिहिले की 'शिवाजीला कैदेत टाकून किंवा ठार मारून आपणास काहीएक फायदा नाही. तो एकटा नाहीसा झाल्याने मराठयांचे