पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४२३
'मऱ्हाष्ट्र राज्य'
 

त्यातूनच सरंजामदारी निर्माण झाली आणि त्याच काळात जातिभेद, वर्णभेद, अस्पृश्यता या रूढी बळावल्या. या सर्वांमुळे या समाजात भिन्नभिन्न परीघ, भिन्न कूप निर्माण झाले. सर्व हिंदुसमाज कूपमंडूक होऊन गेला. यातील वतनदारी, सरंजामदारी यांचा विचार वर केला आहे. आता ग्रामसंस्थांचा विचार करू.
 भारतातील ग्रामसंस्थांचा खूप गौरव केला जातो, आणि एका काळी ग्रामसंरक्षण, ग्रामविकास या दृष्टीने या संस्थांनी चांगले कार्य केले यात शंका नाही. पण प्रारंभापासूनच विषय, भुक्ती, ग्राम अशा ज्या संस्था येथे होत्या, त्यांवरचे अधिकारी राजा नेमीत असे आणि तो अधिकारी वंशपरंपरेने नेमावा, असा शास्त्रकारांनी दण्डकच घालून दिला होता. या पद्धतीतूनच पुढे येथे सरंजामशाही सुरू झाली. शिवाय हळूहळू चातुर्वर्ण्य आणि जातिभेद यांचा जोर वाढू लागला, तेव्हा या संस्थांचे लोकायत्त रूप नाहीसे होऊन सभासदांत पराकाष्ठेची विषमता निर्माण झाली. न्यायाच्या दृष्टीने समता ही तर भारतात शास्त्रकारांनीच निषिद्ध मानली होती. अपराध तोच असला तरी शिक्षा वर्णाप्रमाणे व्हावी असे शास्त्र होते. त्यामुळे या संस्थांतून व्यक्तित्वाचा विकास कधीही झाला नाही आणि मग ग्रामापलीकडे दृष्टी नाही, आणि जातिपलीकडच्या हिताअहिताचा विचार नाही, आणि स्वतंत्र विचार करण्याचे सामर्थ्य नाही, असे होऊन भारतीय समाज हा समाजच राहिला नाही. (सातवाहन ते यादव या कालखंडाच्या विवेचनातील 'स्वायत्त संस्था व लोकसंघटना' या प्रकरणात, डॉ. आळतेकर, डॉ. वेणीप्रसाद, डॉ. रामशरण शर्मा यांच्या आधारे, या विषयाचे सविस्तर विवेचन केले आहे. म्हणून येथे तो अगदी संक्षेपाने सांगितला आहे.) यातच मुस्लिम कालात वतनदारीला अत्यंत घातकी रूप आल्यामुळे सामान्य माणूस ग्रामापलीकडे आणि देशमुख देशपांडे आपल्या वतनी मुलखापलीकडे पाहत नाहीसे झाले. अखिल समाज, अखिल देश, सर्व स्वधमींय समाज यांचे काही आपण लागतो ही भावनाच या भूमीतून नाहीशी झाली. अशा लोकांतून राष्ट्र ही संघटित शक्ती कशी निर्माण होणार ?

दिल्ली दर्शन
 शिवछत्रपतींनी प्रथम केले ते हे की त्यांनी या लोकांना आपण हिंदू, आपण मराठे, आपले महाराष्ट्र राज्य, असा विशाल विचार करावयास शिकविले. हिंदू तो आपला मित्र, मराठा तो मित्र आणि दुष्ट तुरुक आपला समान शत्रू असा समशत्रुमित्रभाव त्यांनी लोकमानसात निर्माण केला. या समशत्रुमित्रभावातूनच राष्ट्रतत्त्वाचा परिपोष होतो हे मागे सांगितलेच आहे. आपण म्हणजे केवळ ग्रामाचे, तेथल्या गोतसभेचे एक सभासद, त्यापलीकडे आपल्यावर जबाबदारीच नाही, असला संकुचित भाव नष्ट करून छत्रपतींनी 'आपण मराठे' ही दृष्टी त्यांना दिली. परमार्थात आत्मज्ञानाची जितकी आवश्यकता असते तितकीच, किंबहुना त्यापेक्षा जास्त समाजाच्या ऐहिक जीवनात असते. जो कूपमंडूक कूप हेच जग मानतो, मी कूपाचाच मालक असे समजतो, त्याला