पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
४२२
 

छत्रपती झाला ही गोष्ट सामान्य जाली नाही.' (कलम ९४, राज्याभिषेक.) 'आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही, मोगलशाही ह्या चारी पातशाह्या व समुद्रातील बेवीस पातशाह्या असे जेर जप्त करून नवेच राज्य साधून मराठा पादशहा सिंहासनाधीश छत्रपती झाला.' (कलम ११६, राजा अवतारी) शिवछत्रपतींनी हिंदुत्वाचे रक्षण केले, हिंदूचा तिलक राखला, असा त्यांचा गौरव भूषण कवीने केला आहे. तो करताना हा मराठ्यांचा पराक्रम आहे हेही त्याने सांगून टाकले आहे. 'भूषण सुकवि जीति हद्द मरहट्टन की' असे तो म्हणतो.
 रामचंद्रपंत अमात्य यांनी आज्ञापत्रात 'शिवछत्रपतींनी नूतन सृष्टीच निर्माण केली' असे म्हटले आहे. ही नूतन सृष्टी कोणती ? राष्ट्र ही ती सृष्टी होय. अमात्यांनी 'नवे राज्य' असे तिचे वर्णन करून पुढे खूप तपशील दिला आहे. पण ते वर्णन त्या नूतन सृष्टीच्या बाह्यरूपाचे आहे. तिच्या अंतरातले चैतन्य म्हणजे मराठ्यांमध्ये छत्रपतींनी निर्माण केलेली राष्ट्रभावना हे होय. त्या चैतन्यावाचून यवनाक्रांत झालेला भारत संपूर्ण मुक्त करण्यात मराठ्यांना यश आलेच नसते.
 आम्ही कोण या प्रश्नाचे उत्तर जो समाज देऊ शकतो आणि प्राण पणाला लावून त्या उत्तरामागे उभा राहतो तोच समाज पराक्रम करू शकतो. तोच समाज स्वराज्य- साम्राज्य स्थापू शकतो. शिवछत्रपतींनी महाराष्ट्रातील लोकांना, येथील जनतेला, 'आम्ही मराठे' हे उत्तर देण्याचे सामर्थ्य प्राप्त करून दिले. म्हणजेच त्यांनी मराठ्यांचे राष्ट्र निर्माण केले.

(२) ग्रामाचे नव्हे, राष्ट्राचे घटक
 माणसे आपल्या मनानेच आपल्याभोवती लहान लहान परीघ निर्माण करतात आणि तेवढेच आपले जग, तेवढेच आपले कार्यक्षेत्र असे मानून मोठ्या जगाला, समाजाला विसरतात. समाजात विघटना होते, त्याची संघशक्ती क्षीण होते, तो या संकुचित परिघामुळेच होय. या संकुचित भावनेलाच कूपमंडूक वृत्ती म्हणातात. हिंदु- समाजाच्या नेत्यांनी ग्रामसंस्था, वतनदारी आणि जातिवर्णव्यवस्था असे परीघ किंवा कूप निर्माण करून सर्व हिंदुसमाज विस्कळित करून टाकला. राष्ट्र दृष्टीने तर नाहीच, पण धार्मिक दृष्टीने सुद्धा हा समाज संघटित राहिला नाही.

कूपमंडूक
 वास्तविक या देशात प्राचीन काळी भूमिनिष्ठेचा उदय झाला होता. आणि अखिल भारत ही एक भूमी आहे, अशी भावनाही येथे हळूहळू पोसत होती. शिकंदराच्या आक्रमणाच्या वेळी येथे जी लहान लहान प्राजके (प्रजासत्ताक राज्ये) होती, त्यांच्या ठायी राष्ट्रभावनेचा उदय होत होता, असे इतिहासावरून दिसते. ग्रामसंस्था हा त्या काळी या प्राजकांचा पाया मानला जात असे. पण हळूहळू ग्रामसंस्थांना विकृत रूप आले.