पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४१९
'मऱ्हाष्ट्र राज्य'
 

आपले काम झाल्यावर नसते निमित्त ठेवून नाश करतील. महाराजांचे हे मऱ्हाष्ट्र राज्य आहे, सर्वांनी हिम्मत धरून एकनिष्टेने सेवा करावी.' हे बोल ऐकून सर्वांना स्फूर्ती आली व ते महाराजांना मिळाले.
 छत्रपतींनी लोकांना कोणते नवे तत्त्वज्ञान शिकविले असेल याची यावरून कल्पना येईल. वर जी वतनासक्ती वर्णिली आहे तिच्याहून अगदी ध्रुवभिन्न अशी ही वृत्ती आहे. कान्होजीच्या वरील उद्गारांत काही निष्ठा आहे, काही कर्तव्यबुद्धी आहे, शपथेला जागणे आहे, आणि विशेष म्हणजे त्यागाची, वतनाच्या त्यागाचीही, सिद्धता आहे. यांपैकी कोणतेही नीतितत्त्व त्या वेळी वतनदारांच्या ठायी शिल्लक राहिले नव्हते. महाराजांच्या वाणीमुळे आणि प्रत्यक्ष आदर्शामुळे ही नीती या देशमुखांच्या ठायी जागी झाली. पण याहीपेक्षा पलीकडची एक गोष्ट झाली. जे राज्य आता व्हावयाचे आहे, जे होत आहे, महाराज जे स्वराज्य म्हणत आहेत ते मऱ्हाष्ट्र- महाराष्ट्र- राज्य आहे, हा विचार या देशमुखांच्या मनीमानसी ठसला होता.

राष्ट्र - अर्थ
 शिवछत्रपतींनी या भूमीत राष्ट्र निर्माण केले म्हणजे काय केले ? प्रथम काही थोर इतिहासपंडितांनी केलेले वर्णन देऊन मग त्याची थोडी मीमांसा करू. रियासतकार सरदेसाई म्हणतात, 'शिवाजीच्या राज्य स्थापनेचे स्वरूप अनेक दृष्टींनी ध्यानात ठेवण्यासारखे आहे. महाराष्ट्रीयांचे एक राष्ट्र बनून त्यास स्वतंत्रता प्राप्त झाली आणि जगाच्या इतिहासात मराठ्यांचे नाव प्रसिद्धीस आले. तसेच महाराष्ट्रीयांच्या अंगी असलेले गुण बाहेर प्रसिद्ध होण्याची संधी या राज्यस्थापनेने मिळाळी. तिसरी गोष्ट अशी की महाराष्ट्रात परस्परविरोधी अनेक जाती असून शिवाजीचे पूर्वी लोक विस्कळित होते. शिवाजीने त्यांच्या ठिकाणी ऐक्य उत्पन्न केले, म्हणजे प्रत्येक इसमाचे स्वतःचे संबंधाने व समाजाचे संबंधाने असे दोन प्रकारचे कर्तव्य असून या दोन कर्तव्यांचा विरोध टाळून, दोन्ही कशी साधावी, हे शिवाजीने लोकांस शिकविले. ब्राह्मण, मराठे, प्रभू, वैश्य, शूद्र इत्यादी नाना जातींच्या लोकांनी, आपली जात, पाहिजे तर, आपल्या घराच्या उंबरठ्याच्या आत खुशाल पाळावी; परंतु बाहेर आल्यावर कोणत्याही सार्वजनिक कामात सर्व लोक सारखे, सर्वांनी एकदिलाने राष्ट्रहित, समाजहित, सार्वजनिक हित साधलेच पाहिजे, अशा प्रकारे स्वकर्तव्य बजावण्याची अपरिहार्य जबाबदारी शिवाजीने प्रत्येक इसमाच्या मागे लावून दिली.' (शककर्ता शिवाजी, पृ. २१७)
 या एका परिच्छेदात राष्ट्रीयत्वाचे सर्व घटक सांगून, राष्ट्रतत्त्वाची अतिशय सम्यक कल्पना नानासाहेबांनी दिली आहे. प्रत्येक व्यक्ती सार्वजनिक कार्यात सहभागी झाली पाहिजे. समाजहित, समाजाचा उत्कर्ष ही प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे, हा त्यातला प्रधान घटक होय सर्व जातींना समप्रतिष्ठा आहे, हा दुसरा घटक होय. आणि