पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
४१८
 

मूळ शिर्क्यांचे. गुजर, मोहिते, महाडिक यांच्या मदतीने ते आदिलशहाला जुमानीनात. त्या वेळी मोरे कर्नाटकात होते. पातशाही हुकमावरून त्यांनी शिर्क्यांवर चालून जाऊन त्यांचा बंदोबस्त केला. पण शिर्के, गुजर, मोहिते, महाडिक यांनाच आपण मिळावे आणि सुलतानाला पदच्युत करून आपले राज्य स्थापावे असे त्यांच्या मनात आले नाही. 'आम्हांस पातशहाने राज्य दिले आहे' असा दिमाख ते मिरवीत. मोरे यांच्याप्रमाणेच घाटगे, घोरपडे, या घराण्यांतील पराक्रमी वीरांनी सर्जेराव, प्रतापराव, हिंदुराव, अमीर-उल-उमराव असे किताब निरनिराळ्या सुलतानांकडून मिळविले होते. या किताबात त्यांना भूषण वाटे आणि ते मिळविण्यासाठी ते स्वकीयांवर चालून जात, कत्तली करीत, जाळपोळ, विध्वंस करीत.
 आणि इतके करून मिळविलेले किताबच नव्हे तर ती वतने, त्या मनसबी, आणि त्या मनसबदारांचे जीवितही सुलतानाच्या लहरीवर अवलंबून असे. लहर फिरताच आदिलशहाने मुरार जगदेवास ठार मारले. कुतुबशहाने रामरावास ठार मारले. त्यानेच कदमरावास ठार मारले. लखूजी जाधवरावांचा शेवट असाच झाला. पण त्यांना मारल्यावर, तशाच प्रकारे, त्यांच्या भाऊबंदांनी त्या सुलतानांवर कधी सूड उगवला नाही. त्या सुलतानांना मुसलमान सरदार केव्हाही पदच्युत करीत, ठार मारीत. पण मराठा सरदारांनी हे पाप कधी केले नाही. वतनासाठी आपल्या भाऊबंदांवर ते सूड उगवीत, त्यांच्या बायकामुलांची हत्या करीत. त्यात पाप नव्हते. पण मुस्लिम सुलतान किंवा कोणी सरदार यांवर ते कधी सूड उगवीत नसत.
 अशा या समाजातून शिवछत्रपतींना आदिलशाही, पोर्तुगीजशाही, मोगलशाही या शाह्यांच्या विरुद्ध धैर्याने उभी टाकेल, त्यांच्यावर मात करील, अशी संघशक्ती उभी करायची होती. या समाजातून त्याना राष्ट्र निर्माण करावयाचे होते.

कान्होजी देशमुख
 अफजलखान शिवाजी महाराजांवर चालून येत होता. त्या वेळी, मावळखोऱ्यातील सर्व देशमुखांना, अफजलखानास सामील व्हावे, अशी आदिलशहाची फर्माने निवाली होती. सर्व देशमुखांच्या पुढे मोठा बिकट प्रश्न आला. त्या वेळी कान्होजी जेधे ते फर्मान घेऊन महाराजांच्या कडे आले व सल्ला विचारू लागले. महाराज म्हणाले, 'शेजारचे केदारजी खोपडे व खंडोजी खोपडे खानास मिळाले तसे तुम्ही मिळावे. न गेलात तर वतन जाईल आणि प्राणावरही बेतेल.' यावर कान्होजी म्हणाले, 'शहाजीमहाराजांनी तुमचे साह्य करण्याविषयी आमच्याकडून शपथ घेवविली आहे. त्या शपथेला आम्ही जागणार. मग वतनाचे काही होवो.' हे उत्तर ऐकून महाराजांना आनंद झाला. मग त्यांनी कान्होजींना इतर देशमुखांची बैठक घेऊन सर्वांचा विचार घेण्यास सांगितले. त्या बैठकीला बांदल, सिलीमकर, पासलकर, मारणे, ढमाले, मरळ, डोहार असे अनेक देशमुख वतनदार आले होते. त्यांना कान्होजी जेधे म्हणाले, 'मुसलमान बेइमान आहेत.