पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
४१२
 

वतन दिले. कोणाला दूधभात म्हणून, कोणा स्त्रीला साडीचोळी म्हणून इनामेही दिलेली आहेत. याशिवाय धर्मार्थ जमिनी दिल्या त्या निराळ्याच. तशा त्या दिल्या पाहिजेत असा अमात्यांचा सुद्धा आग्रह आहे. ते म्हणतात, 'धर्मार्थ भूमिदान देणे याचे पुण्य अनंत आहे. श्रीची, वेदशास्त्रसंपन्न, सद्ब्राह्मण पाहून पर्वादी पुण्यकाळी ग्राम अथवा भूमी द्यावी. तशीच देवायतने, सत्पुरुषांचे मठ, समाधिस्थाने असे स्थळीही ग्राम अथवा भूमी द्यावी.' याप्रमाणे छत्रपतींनी दाने दिल्याची उदाहरणेही आहेत. समर्थांना अशी भूमी दिली होती हे तर प्रसिद्धच आहे. चाफळच्या मठास व उत्सवास महाराजांनी कायमचे उत्पन्न करून दिले होते. भोसल्यांचे पुरोहित राजोपाध्ये यांना सूर्यग्रहणाच्या वेळी एक चावर जमीन दिली होती. अशी आणखी काही उदाहरणे आढळतात. पण धर्मार्थ इनामे, वतने, अग्रहार दिले तरी त्यासंबंधातही महाराज सावध असत. गावाचा संभाळ करणे हे जसे देशमुखाचे कर्तव्य तसेच धर्मकार्य करणे हे ब्राह्मणांचे कार्य होय. ते त्यांच्याकडून होत नाही असे दिसताच महाराजांनी ब्राह्मणांची इनामे व अग्रहारही अमानत- जप्त- केले आहेत. राजाराम छत्रपती यांच्या एका सनदेत तसा उल्लेख आहे. 'मौजे माहुली हा गाव आदिलशाहीचे वेळेपासून इनाम चालत होता. पुढे हा देश राजश्री कैलासवासी स्वामीस हस्तगत झाला. त्या दिवसापासून ब्राह्मणाचे इनाम अनामत करून ब्राह्मणांच्या योग्यता व कुटुंबे पाहून त्या त्या योग्य ब्राह्मणांस धान्य देविले होते.' (सनदापत्रे पृ. १३६)

प्रजाभिमुख अर्थव्यवस्था
 या सर्व विवेचनावरून शिवछत्रपतींचे वतनदारीविषयी धोरण काय होते ते ध्यानात येईल. रयत सुखी झाली पाहिजे हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट होते. तिला संभाळण्यासाठी देशमुख, देशपांडे, देसाई, पाटील, कुळकर्णी यांना वतने दिलेली असतात. हे वतनदार जोपर्यंत आपले कर्तव्य चोख पार पाडतात तोपर्यंत त्यांच्या वतानाला हात लावावा असे महाराजांना वाटत नसे. कारण त्या काळी तीच अर्थव्यवस्था फलप्रद होती. पण ते कर्तव्यच्युत होताच महाराज त्यांची वतने अमानत करीत किंवा त्यांना कडक शिक्षा करीत. याचा अर्थ असा की वतने ही पूर्वजांच्या पराक्रमासाठी दिलेली इनामे नसून प्रत्यक्ष राजसेवा करण्यासाठी दिलेला तो तनखा होता. दरमहा देण्याऐवजी तो कायमचा असे, एवढाच फरक. स्वराज्यापूर्वी या वतनांना स्वतंत्र, बेजबाबदार राज्यांचे स्वरूप आले होते व त्यात प्रजा नागविली जात होती. महाराजांनी ते स्वरूप पालटून टाकले आणि प्रजाभिमुख अर्थव्यवस्था निर्माण केली.
 महाराजांच्या आर्थिक क्रांतीचे स्वरूप येथवर स्पष्ट केले. पण सभासदाची बखर आणि अमात्यांचे आज्ञापत्र यात थोडी निराळी तत्त्वे सांगितली आहेत. ती महाराजांची म्हणून सांगितली आहेत आणि तशी थोडी माहितीही दिली आहे. त्याविषयी थोडी तात्विक चर्चा करून हे विवेचन संपवू.