पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४११
अर्थमूलो हि धर्मः ।
 

उजाड झालेली गावे पुन्हा वसविण्याचे, सर्व भूमी सजल - सफल करण्याचे अत्यंत मह्त्त्वाचे कार्य हे वतनदार करीत असत या कार्याचे छत्रपतींना इतके महत्त्व वाटत असे की फितूर झालेले, बंडखोरी करून उठलेले वतनदार जर माफी मागून परत येण्यास तयार असतील, तर त्यांना कौलनामा देऊन म्हणजे अभय देऊन त्यांची वतने ते परत देत असत. केदारजी खोपडे हा अफजलखानास मिळाला होता. पुढे अफजलखान मेल्यावर परत येऊन तो गावाला त्रास देऊ लागला. त्या वेळी छत्रपतींनी अत्यंत कडक शब्दांत त्याची कान उघाडणी केली; पण शेवटी त्याचे वतन त्यास परत दिले. 'कोणे बाबे आंदेशा न करून आपल्या वतनास येणे आणि आपले देशमुखीचा हक्क व इनाम खाऊन खुशालीने राहणे, काही शक (भीती) न धरणे.' असा कौलनामा त्याला दिलेला आहे. पण त्यापूर्वी 'साहेबासी गैररुजू असावे आणि आपल्या हक्कास खलल करून घ्यावे हे अक्कल तुम्हांस कोणे दिधली आहे' अशी त्याची कठोर निर्भर्त्सनाही केलेली आहे. कानद खोऱ्याचा देशमुख झुंजारराव मरळ, गुंजन मावळाचा देशमुख हैबतराव सिलीमकर यांनाही असाच कौलनामा दिलेला आहे. झुंजारराव तर जयसिंगाकडे गेला होता. त्याला 'तुम्हांपासून जो गुन्हा झाला आहे तो माफ केला आहे, तुमच्या जिवास खता होणार नाही' असे अभय देऊन त्याची वतनाची मिरास त्याला परत दिली.

स्नेह व दंड
 महाराजांच्या याच धोरणाचे वर्णन अमात्यांनी आज्ञापात्रात केले आहे. 'अनेक दोष या लोकांत आहेत. म्हणून त्यांचा केवळ द्वेष करावा, वतने बुडवावी म्हणता हाही परम अन्याय, समयविशेषे अनर्थाचे कारण. पण त्यास मोकळी वाग देईन म्हणता यांची निजप्रकृती तेव्हाच प्रगट होणार. या करिता या दोन्ही गोष्टी (वतने बुडविणे किंवा त्यांना बेलगाम राहू देणे ही दोन टोके) कार्यास येत नाहीत. म्हणून त्यास स्नेह व दंड या दोहोंमध्ये निक्षून ठेवावे लागतात. आहे वतन ते चालवून प्रजेवर त्यांची सत्ता चालू न द्यावी, हक्क इनाम आज्ञे विरहीत घेऊ न द्यावे आणि त्यांनी देशाधिकारी यांचे आज्ञेत वर्तावे.'

नवी वतने
 ज्या अमात्यानी वतनदारांची अत्यंत निंदा केली त्यांनीच त्यांना संभाळून ठेवावे असा उपदेश केला आहे. याचे कारण हेच की देशमुख, देशपांडे, पाटील, कुळकर्णी हे लोक त्या वेळच्या अर्थव्यवस्थेचे आधारस्तंभ होते. त्यांच्या अभावी सर्व मुलूख उजाड पडून सर्व अर्थव्यवस्थाच नव्हे, तर अंती राज्यव्यवस्थाही कोसळून पडली असती. यामुळे महाराजांनी जुन्या वतनदारांना तर संभाळलेच, पण काही थोडी नवी वतनेही दिली. बकाजी फर्जंद यास पाटीलकी दिली. रामचंद्र नीलकंठ यास सबनिसी