पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
४१०
 

धाड, दरवडेखोरी, लुटालूट, चोऱ्यामाऱ्या या आपत्ती नित्याच्याच होत्या. शिवाय पडीत जमीन लागवडीस आणणे, पाटबंधाऱ्यांची व्यवस्था करणे, रानटी जनावरांचा बंदोबस्त करणे हीही कामे नित्याचीच होती. प्राचीन काळापासून पूग, श्रेणी, कुल या ग्रामसंस्थाच ही कामे करीत. मुस्लिम रियासतीतही त्या नष्ट झाल्या नव्हत्या आणि छत्रपतींनाही त्या नष्ट करणे शक्य नव्हते आणि इष्टही नव्हते. त्यांच्या अभावी स्वराज्य ओसच झाले असते.
 मग सभासद बखर, आज्ञापत्र यात या वतनदारांची इतकी निर्भर्त्सना का केली आहे ? त्यांना राज्याचे दायाद का म्हटले आहे ? याचे कारण हे की ते वतनदार मुस्लिम रियासतीत बेजबाबदार झाले होते, कर्तव्यच्युत झाले होते. गावाचा संभाळ करण्यासाठी आपल्याला वतने दिली आहेत, याचा त्यांना विसर पडला होता. ते चढेल, मुजोर झाले होते आणि परकी सत्तेखाली त्यांचे भोगविलास निर्बंध चालत असल्यामुळे त्यांना स्वराज्यस्थापना हे संकट वाटत होते. म्हणून स्वराज्याचे मुख्य शत्रू तेच झाले होते.
 यासाठीच महाराजांना त्यांच्यावर हत्यार धरावे लागले. तसे हत्यार धरून त्यांच्यावर सत्ता प्रस्थापित होताच महाराजांनी त्यांचे गडकोट पाडून त्यांनी उभारलेली लष्करी पथके नष्ट करून त्यांना नरम केले, त्यांच्या कर्तव्याची जाणीव देऊन त्यांना पुन्हा स्वपदी प्रस्थापित केले आणि त्यांच्याकडून वर वर्णन केल्याप्रमाणे सेवा घेऊन महाराष्ट्रभूमी पुन्हा वसविली.

सेवेचा मुशाहिरा
 शिवछत्रपतींचे वतनाविषयी काय धोरण होते, हे यावरून ध्यानात येईल. वतन ही मागे केव्हा एकदा केलेल्या पराक्रमाची बक्षिसी आहे असे ते मानीतच नव्हते. तर वर सांगितल्याप्रमाणे गाव किंवा देश- म्हणजे आपापला परगणा - संभाळणे ही जी कायमची सेवा तिचा तो मुशाहिरा होता; आणि म्हणूनच त्या कर्तव्यापासून जे च्युत होत त्यांना ते शिक्षा करून वठणीवर आणीत आणि पुन्हा वतनावर कायम करीत. वतने नष्ट करावी, वतनदारी पद्धतच नष्ट करावी असे त्याचे धोरण नव्हते.

कौलनाम
 त्यांनी काही वतने अमानत म्हणजे जप्त केली हे खरे आहे. पण ती वतनदार फितूर झाले किंवा उद्दाम होऊन चढेलपणे वागू लागले किंवा देशाची कामगिरी करीनासे झाले तेव्हा जप्त केली. पुण्याच्या देसकुळकर्ण्याचे वतन त्यांनी अनामत केले. मुसे खोरे तरफेचे देशमुख व देशकुलकर्णी यांची वतने खालसा केली. रोहिडखोऱ्याचे देशमुख, रांजाचे पाटील यांना त्यांनी अशीच शिक्षा केली. पण या फितूर, भ्रष्ट, चढेल वतनदारांना केलेल्या शिक्षा होत्या. वतनदारी पद्धतीविरुद्ध ही मोहीम नव्हती. तशी मोहीम त्यांना करावयाचीच नव्हती. कारण गाव, देश, परगणा संभाळण्याचे,