पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४०५
अर्थमूलो हि धर्मः ।
 

प्रत्यक्ष संबंध जोडून दिला. असा संबंध नसणे हेच जुन्या अर्थव्यवस्थेचे दुखणे होते. दादोजी शिवाजीराजांना घेऊन प्रथम पुणे आणि सुपे परगण्यात आणि नंतर सर्व मावळ खोऱ्यांतून गावोगाव हिंडले आणि जमिनीची पाहणी मोजणी करून व प्रतवारी लावून दरसाल पिकाचे मानाने वसूल घेण्याचा ठराव त्यांनी केला. प्रारंभी काही वर्षे तर त्यांनी साऱ्याची माफीच दिली, त्यामुळे शेतकऱ्यांना केल्या कष्टाचे फळ मिळेल, अशी खात्री वाटून परागंदा झालेली रयत परत आली आणि वसाहती करून भराभर शेतीची लागवड करू लागली. निजामशाहीतील वजीर मलिकंबर आणि दुसरा अधिकारी चतुर सावाजी यांनी याच पद्धतीने वऱ्हाडात व्यवस्था घडवून आणली होती. दादोजींनी ती स्वतः पाहिली होती. तिची उत्तम फळे त्यांच्या ध्यानात आली होती, म्हणूनच पुणे परगण्यात येताच त्यांनी त्याच पद्धतीने पुणे वसविले.

अभय दिले
 पुणे प्रांती दादोजींना शहाजी राजांनी पाठविले, तेव्हा त्याच वेळी त्यांच्या तैनातीस एक हजाराची पागा बनवून दिली होती. शिवाय दादोजींनी स्वतः मावळे लोकांच्या बिनकवायती पलटणी तयार केल्या. कारण त्यावाचून त्यांना एक पाऊलही पुढे टाकता आले नसते. रयतेशी राजांचा साक्षात संबंध जोडणे याचा अर्थ देशमुख, पाटील, कुळकर्णी, देसाई, तर्फदार यांची सत्ता कमी करणे किंवा नष्ट करणे असा होता. याला सुखासुखी कोणीही कधीही तयार होत नाही. दादोजींनी लष्करी बळाने या सगळ्या मोकासावाल्यांना, मक्तेदारीला चटावलेल्या लोकांना, प्रथम नरम केले. कृष्णाजी बांदल हा भोर परगण्यातील देशमुख फारच पुंडाई करू लागला. दादोजींनी त्याला पकडून आणून त्याचे हात पाय तोडले. रामजी चोरघे, फुलाजी नाईक यांना त्यांनी ठार मारले. एका ब्राह्मणाने वसुलाचा भरणा करण्यात टाळाटाळ चालविली. त्यालाही दादोजींनी देहान्त शासन दिले. कास्मा दि गार्दा याने पोर्तुगीज भाषेत जे शिवचरित्र लिहिले त्यात म्हटले आहे की शिवाजीने प्रथम रयतेला अभय दिले. या अभयाचा हा अर्थ आहे. मिरासदार, तर्फदार, देशमुख हे रयतेचे काळच होते. त्यांच्या मुलखात रयतेला कशाचीही शाश्वती वाटत नसे. शेतीची लावगड करण्याचा तर लोकांना मुळीच उत्साह नसे. कारण उभ्या पिकाची किंवा धान्याची लूट केव्हा होईल याचा काही धरबंधच नव्हता. दादोजींनी प्रथम अनेक देशमुखांना दहशतीने आणि पुढे सौजन्याने वश करून घेतले आणि रयतेला निर्भय केले. तिच्या जीवित- वित्ताची शाश्वती निर्माण केली. त्यामुळे दहा वर्षाच्या काळात मुलखात अबादानी व भरभराट होऊन वसूल पुष्कळ येऊ लागला आणि दादोजींना द्रव्यसंचय करता आला. अमात्यांनी म्हटलेच आहे, 'खजिना म्हणजे राज्याचे जीवन' सभासद बखरीत दादोजींच्या कार्याचे पुढीलप्रमाणे वर्णन केले आहे: 'शहाजी राजे यांनी दादाजीपंतास व राजे यांस पुण्यास रवाना केले. ते पुण्यास आले. येताच बारा मावळे