पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
४०४
 

भेद तिकडे करून राज्यात शत्रूचा प्रवेश करवितात, मग तेच राज्याचे अपायभूत होऊन दुःसाध्य होऊन जातात.' (प्रकरण ६ वे).
 अशा या मनसबदारांच्या किंवा तर्फदारांच्या हाती शिवपूर्वकाली महाराष्ट्र होता. राजसत्ता जरी आदिलशहा, निजामशहा यांच्या हाती होती तरी आपापल्या मुलखात राज्य या तर्फदारांचे होते. सरदेसाई म्हणतात, 'हे तर्फावर नेमलेले अधिकारी एक प्रकारचे स्वतंत्र राजेच होते. दिवाणी, मुलकी, फौजदारी व लष्करी वगैरे सर्व अनियंत्रित अधिकार त्यांजकडे असत. तर्फदारास जहागिरी नेमून दिलेल्या असत. रोकड वेतन नसे. '

अर्थ आणि काम
 वतनदार, तर्फदार यांची निरनिराळ्या ठिकाणी आलेली वर्णने वाचली म्हणजे हे स्पष्ट दिसते की त्यांना कोणतेही मूल्य, कोणतीही निष्ठा अशी नव्हतीच. धर्म नाही, स्वामी नाही, नीती नाही, स्त्री नाही, बाल नाही. ते फक्त वतन जाणीत. प्रजाजनांना पिळून अमाप पैसा वसूल करावयाचा आणि त्यातील ठरीव खंडमक्ता बादशहाला धाडून दिल्यानंतर बाकीच्या पैशावर भोगविलास करावयाचे हा त्यांचा मुख्य धंदा होता. अशा या देशनायकांच्या सत्तेखाली मुलखात काही अर्थव्यवस्था असू शकेल हे शक्यच नव्हते. लूटमार, शोषण हीच सर्व अर्थव्यवस्था तेव्हा होती. सरंजामी अर्थकारण ते हेच. हे शोषणप्रधान अर्थकारण समूळ नष्ट करून प्रजाजनांच्या भाकरीची निश्चित हमी देणारी अर्थव्यवस्था प्रस्थापिल्यावाचून स्वराज्यस्थापनेच्या प्रयत्नात कोणालाही यश येणे शक्य नव्हते. छत्रपतींनी तशी अर्थव्यवस्था निर्माण केली आणि हळूहळू सर्व मराठा समाज, अखिल महाराष्ट्र आपल्या पाठीशी उभा केला. 'धर्मात् अर्थश्च कामश्च ।' असे वेदव्यासांनी म्हटले आहे. छत्रपतींनी मराठ्यांना, शेतकऱ्यांना साळी, माळी, सुतार, कोष्टी सर्वांना दाखवून दिले की त्यांनी स्वधर्मसाधना केली तर धर्माबरोबरच अर्थ आणि काम हेही पुरुषार्थ त्यांना साधतील. हे दिसू लागताच, त्याचा प्रत्यय येताच, सर्व मराठा समाज मुस्लिम सत्तेशी प्राणपणाने लढण्यास सिद्ध झाला. (या विषयाचे सांगोपांग आणि समतोल विवेचन डॉ. अ. रा. कुलकर्णी यांनी आपल्या 'शिवकालीन महाराष्ट्र' या इंग्रजी प्रबंधात केले आहे. जिज्ञासूंनी ते अवश्य पहावे.)

दादोजी शहाणा
 शिवछत्रपतींनी ही जी नवी अर्थव्यवस्था निर्माण केली तिचा पाया त्यांचे गुरुजी दादोजी कोंडदेव यांनी घातला होता. जुन्या बखरीत आणि कागदपत्रात, 'दादोजी शहाणा,' असा त्यांचा उल्लेख नेहमी येतो. आणि खरोखरच दादोजी अद्वितीय असा शहाणा पुरुष होता. पुणे जहागिरी व्यवस्था पाहण्यासाठी शहाजीराजांनी बंगरूळहून शिवाजीराजांच्याबरोबर त्यांना पाठविले, तेव्हा येताक्षणीच त्यांनी या आर्थिक परिवर्तनास प्रारंभ केला. त्यांनी पहिली गोष्ट केली ती ही की रयतेचा आणि राजाचा