पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
४०६
 

काबीज केली. मावळे देशमुख बांधून, दस्त करून, पुंड होते त्यांस मारिले. पुढे शिवाजी राजे कारभार करीत चालले.'
 शिवाजी राजे यांनी दादोजींच्या मृत्यूनंतर स्वतःच कारभार हाती घेतला. पण धोरण तेच ठेवून दादोजींनी जी पायाभरणी केली होती तिच्यावरच नव्या अर्थव्यवस्थेची उभारणी केली. या अर्थव्यवस्थेचे पहिले लक्षण त्या मुलखात माजलेले अराजक, तेथला अंधेर कारभार, तेथली अंदाधुंदी मोडून काढून शेतकरी, कष्टकरी यांना दिलासा देणे व शेतीचा व कारागिरीचा उद्योग करण्यास प्रोत्साहन देणे हे होय. तसे केल्यानेच मुलूख समृद्ध होतो हे दादोजींनी दाखवून दिले होते.

वेध लावला
 वतनदार देशमुख यांना वश करताना राजे प्रथम स्नेह, प्रेम, मधुर वाणी यांचा उपयोग करीत. बखरकार म्हणतात, 'मातबर चहू जागचे मराठे यांसी आप्तपणा करावा, पत्रे लिहावी, त्यांस आणून भेट घ्यावी, आपण त्यांजकडे जाऊन, आम्हांस अनुकूल असावे, असे बोलावे. असे करण्यात महाराजांचे बोलणे परम आदराचे व पराक्रमाचे. ऐकावे त्यांस वेध लागून वाटावे की हे परम थोर आहेत. यांचेच संमते चालावे. हे सांगतील तसे वागावे. प्राणही गेले तरी जावोत, परंतु सेवा करून यांचे आज्ञेत चालावे. अशी सर्वांची चित्त वेधून घेतली.' (सप्त प्रकरणात्मक चरित्र, चिटणीस)

अमानत केले
 कान्होजी जेधे, बाजी पासलकर, चाकणचा किल्लेदार फिरंगोजी नरसाळा यांना छत्रपतींनी या प्रकारे वश केले. आणि त्यांनीही आमरण त्यांची एकनिष्ठेने सेवा केली. त्यांनी स्वतःचा मुलूख तर स्वराज्यात सामील केलाच, पण इतर देशमुख, वतनदार यांनाही नरम करण्यात महाराजांना साह्य केले. जावळीच्या मोऱ्यांच्या बाबतीत छत्रपतींनी प्रथम समोपचारच केले होते. १६४८ च्या सुमारास दौलतराव मोरे वारले. तेव्हा त्यांच्या बायकोच्या मांडीवर दत्तक देऊन तिला कारभारात सर्वतोपरी साह्य केले. पण पुढे अफजलखानाची नेमणूक वाईस झाली, तेव्हा दत्तक यशवंत फितला. एवढेच नव्हे, तर हैबतराव सिलीमकर, कान्होजी जेधे यांनाही फितवू लागला आणि ते ऐकेनात, तेव्हा त्यांच्या मुलखावरही आपली सत्ता सांगू लागला. यातूनच जावळी प्रकरण उद्भवले व महाराजांना मोऱ्यांचा निःपात करावा लागला.
 सुप्याचे संभाजी मोहिते हे शिवाजी राजे यांचे सावत्र मामा यांनी मोऱ्यांच्या प्रमाणेच पुंडाई चालविली होती. तेव्हा त्यांच्यावर एका रात्री छापा घालून राजांनी त्यांना कैद केले. आणि ते काहीच ऐकावयास तयार होईनात, तेव्हा त्यांना कर्नाटकात पाठवून दिले. राजमाची किल्ला विजापुरी सरदार मुल्ला महंमद याच्या ताब्यात होता.