पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
महाराष्ट्र संस्कृती
१६
 

यावरून निश्चित दिसते. तेव्हा त्याच्या आधी दोन एक शतके तरी या भाषेची उत्पत्ती झाली असली पाहिजे, हे मान्य केले पाहिजे. अशा रीतीने महाराष्ट्री ही महाराष्ट्राची भाषा होती व ती इ. पू. ४ थ्या ५ व्या शतकापर्यंत मागे जाते याविषयी शंका राहात नाही. 'प्राकृत शब्दमहार्णव' या कोशाचे कर्ते पं. हरगोविंददास शेठ यांनी या कोशाच्या प्रस्तावनेत महाराष्ट्री प्राकृत महाराष्ट्रातच निर्माण झाली, ती अशोक पूर्वकाळात रूढ होती व पुढे त्या महाराष्ट्रीच्या अपभ्रंशापासूनच मराठी झाली असे मत दिले आहे (पृ. ३८-४६ ).
 आर. पिशेल हा जर्मन पंडित होय. त्याने भारतातील प्राकृत भाषांचा अभ्यास करून ' ए कंपॅरेटिव्ह ग्रामर ऑफ दि प्राकृत लंगवेजेस' हा ग्रंथ लिहिला आहे. वर आतापर्यंत जे महाराष्ट्रीसंबंधी विवेचन केले आहे त्याचा समारोप त्याच्या वरील ग्रंथातील अवतरणांवरून उत्तम होईल असे वाटते म्हणून ती जुळवून येथे देतो. जेव्हा भारतीय पंडित 'प्राकृत' हा शब्द वापरतात तेव्हा सर्वसाधारणपणे महाराष्ट्री हीच त्यांना अभिप्रेत असते. मराठ्यांची भूमी जी महाराष्ट्र तिच्यावरूनच महाराष्ट्री हे त्यांच्या भाषेला नाव पडले आहे. अशा रीतीने महाराष्ट्रीचा मराठीशी दृढ संबंध आहे यात संदेह नाही. पुढे पुढे कवींनी आपल्या काव्यात महाराष्ट्रीला फार कृत्रिम रूप दिले. पण गाथासत्तसईचे तसे नाही. या सत्तसईवरून हे स्पष्ट होते की त्या ग्रंथापूर्वी प्राकृत साहित्य अतिशय समृद्ध होते ( पिशेलच्या व्याकरण ग्रंथाचे सुभद्र झा यांनी केलेले इंग्रजी भाषांतर. प्रकाशक, मोतीलाल बनारसीदास, दिल्ली (१९२७) पृ. १ ते १४ ).
 या गाथासत्तसईच्या आधारेच अकराव्या शतकातील राजा भोज याने आपल्या 'सरस्वती कण्ठाभरण' ग्रंथात म्हटले आहे की हाल सातवाहन राजाच्या राज्यात प्राकृत जाणीत नाही असा एकही माणूस नव्हता.
 सातवाहनांच्या नंतर महाराष्ट्रात वाकाटक घराण्याचे साम्राज्य होते. इ. स. २५० ते ५५० पर्यंत वाकाटकांनी राज्य केले. प्रारंभी यांचे राज्य विदर्भात होते. पण पुढे ते नर्मदेपासून तुंगभद्रेपर्यंत पसरले होते. वाकाटक राजे प्राकृताचे अभिमानी होते, एवढेच नव्हे, तर त्या घराण्यांतील राजांनी महाराष्ट्री प्राकृतात स्वतः काव्यरचनाही केली आहे. राजा दुसरा प्रवरसेन याने 'सेतुबंध' किंवा 'रावणवहो' हे काव्य रचले आणि राजा सर्वसेन याने 'हरिविजय' हे काव्य रचले.
 वरील प्रमाणांवरून इ. पू. ५०० । ६०० पासून इ. स. ५०० । ६०० पर्यंत महाराष्ट्रात महाराष्ट्री प्राकृत भाषा प्रचलित होती, राज्यकर्त्यांना व लोकांना तिचा अभिमान होता आणि त्या भाषेत या भूमीमध्ये ग्रंथरचनाही होत असे, यांविषयी शंका घेण्यास जागा राहणार नाही. एखाद्या समाजाची व देशाची पृथगात्मता सिद्ध होण्यास एवढी प्रमाणे पुरेशी आहेत.
 संस्कृतातील सुप्रसिद्ध कवी दण्डी हा ७ व्या शतकात होऊन गेला. त्याने या